आदेश पाळतात गरीब अन टवाळखोर आणतात ‘काव’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

शहर वाहतूक शाखेने केली 18 हजार वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई, 2 हजार वाहने जप्त, 220  दुचाकी चालकांवर डबल सीट वाहन चालविल्याने गुन्हे दाखल

अकोला  ः तापमान 47 सेल्सीअस. रस्त्यावरची धूळ, कधी पाणी मिळत नाही तर कधी उभे राहायला नाही मिळत साधी सावलीसुद्धा. असे असतानाही या कोरोनाच्या महामारीत वाहतूक पोलिस 24 मार्चपासून सतत रस्त्यावर उभे राहून सेवा देत आहेत. असे असले तरी, अकोल्यातील सर्वसामान्य गरीब आदेश पाळतात, मात्र टवाळखोर नुसता ‘काव’ आणत असल्याचे चित्र आहे. याच टावळखोरांना अद्दल घडविण्यासाठी शहर वाहतूक शाखेने आतापर्यंत 18 हजार वाहनांवर कारवाई केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 24 मार्च पासून लॉकडाउन लागू करण्यात आले होते. या कालावधीमध्ये समूह संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली होती. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर निघू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी यांनी दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने चालविण्यावर काही निर्बंध घातले होते. सदर निर्बंधाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. सदर आदेशानुसार पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशाप्रमाणे शहर वाहतूक शाखेने पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात वेळोवेळी धडक मोहीम राबवून कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्या जवळपास 18 हजार वाहन धारकांवर दंडात्मक कार्यवाही करून लाखोंचा दंड वसूल केला आहे.

दोन हजार वाहने जप्त
दिलेल्या निर्देशाचा भंग करून कायदेशीर कागदपत्र जवळ बाळगले नाही म्हणून जवळपास 2 हजार वाहने तात्पुरते जप्त करण्यात आले. त्यापैकी जिल्हाधिकारी यांचा आदेशाचा भंग करून विनाकारण डबल सीट वाहन चालविल्याने 220 वाहन धारकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले.

नागरिकांनी स्वयं शिस्तीचे पालन करून अकोल्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करून आपल्यावर होत असलेली दंडात्मक व इतर कारवाई टाळावी.
-गजानन शेळके, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obeying orders brings misery to the poor

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: