वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या ट्रॅक्टरने सुरू होती नांगरणी; तेव्हा आले वनकर्मचारी अन्...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

वनपाल विठ्ठल दादाराव सानप (वय 50) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनपाल म्हणून कार्यरत आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या ट्रॅक्टरने नांगरणी करण्यास मनाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजता (ता.29) खैरखेड शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वनपाल विठ्ठल दादाराव सानप (वय 50) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनपाल म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी सहकाऱ्यांसह शुक्रवारी (ता.29) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पश्चिम खैरखेड भागात पायी गस्त घालत असताना, वन खंड क्रमांक 327 मधील राखीव जंगलात बबलू कडूबा मोरे (रा. माळेगाव) हा ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून आला. 

आवश्यक वाचा - अरे व्वा! या कुटुंबातील तब्बल आठ जण कोरोना योध्दे, प्रत्येकाचे योगदान अमुल्यच...​

त्यास राखीव वनक्षेत्रात नांगरणी का करतो अशी विचारणा केली असता, त्याने अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली. दरम्यान, गावातील रामकृष्ण मोरे आणि एक अज्ञात व्यक्ती हातात काठी व लोखंडी पाईप घेऊन आले. त्यांनी वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, बबलू मोरे हा ट्रॅक्टर घेऊन पळून गेला.

याप्रकरणी वनपाल व्ही. डी. सानप यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विनोद शिंदे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstruction of government work in buldana district, crime case against three citizen