esakal | लसीकरणासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

बोलून बातमी शोधा

लसीकरणासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
लसीकरणासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत ता. १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर सर्वांचे लसीकरण करण्यासह त्यात खंड न पडू देण्याचे आव्हान आहे. उद्दिष्ट मोठे असल्यानंतर सुद्धा अद्याप या संबंधी राज्य शासनामार्फत जिल्हा आरोग्य विभागाला कोणत्याच प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. दुसरीकडे राज्यस्तरावर अद्याप लस खरेदीचा गोंधळ सुरू असल्याने १८ वर्षावरील नागरिकांचे ता. १ मे पासून पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू होईल किंवा नाही यासंदर्भात सुद्धा शंका उपस्थित करण्यात येत आहे.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ता. १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ता. १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. ता. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात सहा लाखांच्या जवळपास असून, सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्या संख्येने लस घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात नेहमीच लशींच्या तुटवडा भासत आहे.

हेही वाचा: दोन खासदार, सहा आमदार तरीही जनता बेजार!

आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

१८ वर्षावरील नागरिकांना लस घेता यावी यासाठीची ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया बुधवार (ता. २८) पासून सुरू होत आहे. लस घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी ‘कोविन’ या संकेतस्थळावर जावून नाव नोंदणी करुन घ्यावे. ऑनलाईन नोंदणी शिवाय लसीकरण करता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

खासगी रुग्णालयांना लस देणे बंद

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना जिल्हा आरोग्य विभागामार्फत लस देण्यात येत होती. खासगी रुग्णालयांना एल लस १५० रुपयांना आरोग्य विभाग देत होता. परंतु १ मे पासून आता १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्याने महापालिका क्षेत्रातील १० व ग्रामीणमधील २ अशा एकूण १२ खासगी रुग्णालयांना लस देण्यात येणार नाही. संबंधितांना ती लस उत्पादक कंपनीकडून खरेदी करता येईल.

कोव्हॅक्सिनचे २ हजार ७८० डोज मिळाले

कोरोना लसीकरण अधिक वेगाने व्हावे यासाठी जिल्ह्यासाठी मंगळवारी (ता. २७) कोव्हॅक्सिन लशींचे २ हजार ७८० डोज प्राप्त झाले. यापूर्वी रविवारी (ता. २५) कोव्हिशील्डच्या २० हजार लशी मिळाल्या होत्या. त्यामुळे गत दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर लसीकरण जोरात सुरू आहे. परंतु आता ता. १ मेपासून लसीकरण करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संपादन - विवेक मेतकर