पोलिस कारवाई करतायेत म्हणजे तुम्ही... 

भगवान वानखेडे 
Monday, 13 July 2020

जुलैच्या दहा दिवसांत 503 गुन्हे दाखल ः लाखोंचा दंड वसूल

अकोला : लाॅकडाउननंतर अनलाॅकची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. असे जरी असले तरी या अनलाॅकमध्ये कोरोनाचे संक्रमण अती गतीने वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा असे होऊ नये यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासनाकडून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू असून, आतापर्यंत 503 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून, लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईतून अकोलेकर नियमांना केराची टोपली दाखवित असल्याचे दिसून येत आहे. 

24 मार्चपासून देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अनलाॅकची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. अशातच आता या अनलाॅकमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. असे असताना मात्र, अकोल्यात काही नागरिक, व्यापारी, आणि वाहनधारक या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्तपणे अशांवर कारवाई करणे सुरू करण्यात आले असून, 1 ते 12 जुलैपर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा उद्देश सर्वसामान्यांना त्रास व्हावा असा नसून, कोरोनापासून कसे दुर राहता येईल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. 

अशी करण्यात आली कारवाई
मास्क वापरणारे     ः  एकूण 3042

सोशल डिस्टन्स न पाळणारे व्यापारी ः एकूण 433
लाॅडकाउन न पाळणारे वाहन चालक ः एकूण 3220
गुन्हे ः  एकूण 503
वसूल करण्यात आलेला दंड ः 10 लाख 11 हजार 650

धोका मोठा आता तरी व्हा सावध
शासनाने अनलाॅक सुरू केले आहे. अनलाॅक सुरू करणे म्हणजे कोरोनाचा धोका कमी झाला असे नाही. उलट हा कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी वाहन चालकांनी या मोठ्या धोक्याकडे जरा गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. 

आतापर्यंत कोरोनाविरुद्धची लढाई आपण चांगल्या पद्धतीने लढलो आहेत. यामध्ये नागरिकानी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, आता अनलाॅकमध्ये नागरिकांची  सुरक्षा महत्वाची असून, नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 
-सचिन कदम, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action means you ...