पोलिसांना लागले बदल्यांचे वेध

भगवान वानखेडे 
Saturday, 25 July 2020

सार्वत्रिक बदल्यांच्या 15 टक्क्यांमध्ये कोणाचा लागणार नंबर ः अनेकांनी लावली फिल्डींग

अकोला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वत्रिक बदल्यांचे वाहने सुरू झाले आहे. नुकत्याच पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, आता ज्यांचा कार्यकाळ एका विभागात किंवा परिक्षेत्रात आठ किंवा त्यापेक्षा जास्त झाला आहे अशा पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होणार असून, जिल्ह्यात पंधरा टक्के बदल्यामध्ये कोणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या पोलिस महासंचालक कार्यालयातून ऐवढ्यात होणार आहेत. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक हे एका जिल्ह्यात चार वर्ष कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे आलेल्या अधिकाऱ्यांची आकडेवारी घेऊन जिल्हास्तरावर जिल्हा पोलिस अधीक्षक बदल्या करणार असल्याचे समजते. शासनाने कोरोनामुळे आधी बदली न करण्याचे आदेश काढले होते. मात्र, त्यांनतर आता पंधरा टक्के ऐवढ्या बदल्या करण्याचे ठरविले असून, त्यानुसार राज्यभरातील पोलिस विभागात बदल्यांचे सत्र सुरू आहे. तर 31 जुलैपर्यंत बदल्या होणार होत्या त्या आता 10 आॅगस्टपर्यंत करण्यात येणार असून, त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

17 जणांनी केली विनंती तर 12 जणांचा संपला कार्यकाळ
विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील 12 अधिकारी आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, पंधरा टक्क्यांमध्ये यापैकी किती जणांचा नंबर लागतो हे पाहावे लागणार आहे. तर 17 जणांनी बाहेर जिल्ह्यात बदली देण्यात यावी अशी विनंती केली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे दोन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःहून बदली मागितली असून, त्यांची मागणी पूर्ण झाल्यास त्यांच्या जागी कोण येणार यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

कायमस्वरूपी अॅडीशनल एसपी मिळणार
तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या बदलीनंतर अकोला पोलिस विभागाला कायमस्वरुपी अपर पोलिस अधीक्षक मिळाले नाहीत. आता सध्या प्रशांत वाघुंडे हे प्रभारी अपर पोलिस अधीक्षक म्हणुन कार्यभार सांभाळत आहेत. मात्र, आता या सार्वत्रिक बदल्यांमध्ये जिल्ह्याला कायमस्वरुपी अॅडीशनल एसपी मिळणार असल्याची चर्चा आहेत. तर या सार्वत्रिक बदल्यांमध्ये अकोला पोलिस विभागातील अधिकाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न निकाली लागणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police wait for transfer