Powerat80: साहेब म्हणाले 'अभी तो मै जवान हूँ; माझ्या वयाबद्दल बोलू नका, विरोधकांना घरी पाठवूनच घरी जाणार

विवेक मेतकर
Saturday, 12 December 2020

शरद पवारांचं पावसातील भाषण’हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे.

अकोला: ‘शरद पवारांचं पावसातील भाषण’हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा या सभेला वर्षभराहून अधिक काळ लोटलाय.

मात्र,  वयाच्या अठ्ठ्याहत्तरीतही शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर असतात. तरुणांनाही लाजवेल इतकी शिस्त, एनर्जी त्यांच्याकडे असते. असे असतानाही त्यांच्या वयावरून चर्चा केली जाते. याला पवारही आपल्या मिश्किल स्वभावाने उत्तर देतात.

असाच एक प्रसंग अकोल्यातील सभेदरम्यान घडला होता.  ही पावसातील भाषणाच्या जेमतेम काही दिवसांपूर्वीची सभा असेल. आपलं वय झाल्याचा उल्लेख करणाऱ्यांचा शरद पवारांनी चांगलाच मिश्कील समाचार घेतला.

'अभी तो मै जवान हूँ, म्हणत पवारांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. वयाचा उल्लेख करणाऱ्या आपल्या पक्षाच्या नेत्यांची फिरकी घेतांना पवार म्हणाले की, माझ्या वयाबद्दल बोलू नका. मी तूमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, हे लक्षात ठेवा. विरोधकांना घरी पाठवूनच आपण घरी जाणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

अकोला जिल्ह्यातील ते भाषण पूर्णतः शेतकरी केंद्रीत होते. आपण शेतकर्यांच्या पिकाला भाव देत असतांना भाजपवाले आपल्याला महागाईचं कारण देत विरोध करायचे. त्यावेळी मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा टोला पवारांनी लगावला होता.

शरद पवार यांचा पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा दौरा झाला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा करणार होते. सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी पवारांचा हा दौरा महत्त्वाचा ठरला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पवार यांनी काही भागात अनेक भागात सभा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पवार साहेबांनी सरकारवर तोफ डागण्यासाठी सुरूवात केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Powerat80: At Akola, Sharad Pawar said, Right now I am young; Dont talk about my age