
Prakash Ambedkar : ...तर उद्धव ठाकरे गट निवडणुकीपासूनही वंचित
अकोला : पक्षाचे नाव आणि चिन्हं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला नवीन पक्ष स्थापन करावा लागणार आहे. त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल.
सध्याची परिस्थिती बघता त्यापूर्वीच म्हणजे एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहवे लागू शकते, असे भाकित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंंबेडकर यांनी सोमवारी (ता.२०) अकोला येथे वर्तविले.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्यच करावा लागेल, असे सांगून वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याने सांगितले.
आमची युती ही वैयक्तिक असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. त्यासोबत त्यांनी महाविकास आघाडीत वंचितला घेण्याबाबतचा निर्णय हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावयाचा आहे. आमची युती ही ठाकरे यांच्यासोत आहे. इतर पक्षासोबत नाही. महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा एकटच निवडणुकीला सामोरे जाऊ, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी शिष्टाई करणार नाही. तो माझ्या अखत्यारीतील विषय नाही, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. माझे दोन चेहरे आहेत. एक बाबासाहेबांचा नातू म्हणून तर दुसरा राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
अकोला : गेले दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. हा देशद्रोह आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये, अशी जनहित याचिका मुंबई येथील रोहन पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे दिली.