esakal | भाजी बाजारात भाजी व फळ विक्रीस मनाई

बोलून बातमी शोधा

भाजी बाजारात भाजी व फळ विक्रीस मनाई
भाजी बाजारात भाजी व फळ विक्रीस मनाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांना सोईचे व्‍हावे याकरिता जनता बाजार येथील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मनपा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र मनपा आयुक्‍त निमा अरोरा यांनी शुक्रवारी (ता. २३) जनता बाजाराची पाहणी केली असता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी व्यावसायिक कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्‍याने आणि जनता बाजार येथून कोरोना विषाणूचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्‍याने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांनी शहरातील जनता भाजी बाजारात भाजी, फळ विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीर जनता भाजी बाजार येथील होलसेल व किरकोळ भाजीपाला व फळ विक्रीस २३ एप्रिल ते २ मे २०२१ पर्यंत पूर्णत: बंदी राहील, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनता बाजार येथील किराणा व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. या व्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत. भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार, वाशीम रोड व सावित्रीबाई ज्योतिबा फुले भाजी बाजार-लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील. महात्मा फुले भाजी बाजार-वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतिबा फुले भाजी बाजार, लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणून जनता भाजी बाजाराचा यापुढे हर्रासी करीता वापर करता येणार नाही. जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांना भाटे क्लब प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील. जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ फळ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना मुंगीलाल बाजोरिया प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
----------------------
अन्यथा कठोर कारवाई
किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करीता व्यवसायिकांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून व्यवसायिकांवर कोराना नियमांचे उल्लंघण करत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल. व्यवसाय धारकांना व्यवसाय करताना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्‍यावसायिकांविरुध्‍द महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम व साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा २००५ अन्‍वये कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

संपादन - विवेक मेतकर