esakal | Akola : प्रचार तोफा थंडावल्या; आता छुप्या प्रचारावर भर
sakal

बोलून बातमी शोधा

akola

प्रचार तोफा थंडावल्या; आता छुप्या प्रचारावर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीतील प्रचार रविवारी (ता. ३) सायंकाळी थांबला. परंतु आता मतदानापर्यंत उमेदवार व त्यांचे समर्थक छुप्या पद्धतीने मतदारांशी संपर्क करत त्यांना विविध प्रलोभन देतील. पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ५) मतदान तर बुधवारी (ता. ६) मतमोजणी होणार असल्याने राजकीय घडामोळींना वेग आला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी प्रवर्गातील जागा रिक्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १४ तर पंचायत समितीच्या २८ जागांसाठी मंगळवारी (ता. ५) मतदान तर बुधवारी (ता. ६) मतमोजणी होणार आहे.

एकूण ४२ जागांसाठी १८७ उमेदवार पोटनिवडणुकीत रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, प्रहार व भाजप स्वबळावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची आघाडी असल्याने अनेक मतदारसंघात तिरंगी तर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीनंतर जिल्हा परिषदेमधील सत्तेचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससह वंचितच्या इतर पक्षांमार्फत प्रचारावर जोरदार भर देण्यात येत आहे.

दाेन दिवस आठवडी बाजार बंद

निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी मंगळवार (ता. ५) व मतमोजीणीच्या दिवशी बुधवारी (ता. ६) भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जारी केला आहेत.

निवडणूक क्षेत्रातील शाळांना दोन दिवस सुटी

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीनिमित्त ४ ऑक्टोबर रोजी मतदान अधिकारी, कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेवून मतदान केंद्रावर पोहोचणार असल्याने या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुटी देण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी (ता. ५) सुद्धा शाळांना सुटी देणे आवश्यक असल्याने निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटांसह पंचायत समितीच्या गणांमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार आहेत.

loading image
go to top