पुणे, ठाणे पाठोपाठ अकोल्यात सुद्धा तीन दिवस संपूर्ण लॉकडाउन

सुगत खाडे
Saturday, 11 July 2020

जिल्ह्यातील कोविड-19 बाधितांवर एकीकडे वैद्यकीय उपचार होत असतानाच दुसरीकडे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची येत्या कालावधीत कडक अंमलबजावणी करावी. तसेच पुढील आठवड्यात 18, 19 व 20 जुलै या तीन दिवशी संपूर्ण लॉकडाऊन पाळावे, असे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

अकोला  ः जिल्ह्यातील कोविड-19 बाधितांवर एकीकडे वैद्यकीय उपचार होत असतानाच दुसरीकडे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची येत्या कालावधीत कडक अंमलबजावणी करावी. तसेच पुढील आठवड्यात 18, 19 व 20 जुलै या तीन दिवशी संपूर्ण लॉकडाऊन पाळावे, असे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

कोविड-19 संदर्भात जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. 11) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 
 
आता ग्रामीण भागात फैलाव 
बैठकीत जिल्ह्याच्या कोविड संसर्गासंदर्भातील माहितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात आता अकोला महानगरातील संसर्गाच्या फैलाव बऱ्याच अंशी कमी होत असला तरी ग्रामीण भागात मात्र फैलाव होत असल्याबाबत पालकमंत्री कडू यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी लोकांची ग्रामीण भागातून व शहरातून होत असलेल्या ये-जा करण्यावर आधीपासून घालण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी कसे निर्देश दिले. 

नाकाबंदी व जमावबंदीचे पालन करा! 
ग्रामीण तसेच शहरी भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. मास्क विना अनेक लोक घराबाहेर पडतात. याच गोष्टी संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरत आहेत. तेव्हा यासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे कडक पालन करण्यात यावे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नाकाबंदी व जमावबंदीच्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंलबजावणी करा, असे निर्देश कडू यांनी प्रशासनाला दिले. पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी पाण्याच्या डबक्‍यांवर फवारणी करुन डासांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune, thane followed by akola also had a complete lockdown for three days