esakal | लस घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या रांगा

बोलून बातमी शोधा

लस घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या रांगा
लस घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या रांगा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोन प्रतिबंधात्मक लसींचा जिल्ह्यासाठी रविवारी (ता. २५) साठा प्राप्त झाला. त्यामुळे सोमवारी (ता. २६) महानगरातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहिमेने वेग पकडल्याचे दिसून आले. यावेळी बहुतांश केंद्रांवर लस घेण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा १० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. परंतु केंद्र शासनाकडून अल्प प्रमाणात लशींचा साठा प्राप्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम २४ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी प्रभावित झाली होती. दरम्यान रविवारी (ता. २५ एप्रिल) जिल्ह्यासाठी कोव्हिशील्डचे २० हजार डोज जिल्ह्याला मिळाले. त्यामुळे लसीकरण मोहीमेने सोमवारी (ता. २६) बहुतांश केंद्रांवर वेग पडल्याचे दिसून आले. जुने शहरातील कस्तुरबा गांधी रूग्णालयातील लसीकरण केंद्रांवर सोमवारी (ता. २६) सकाळपासून लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी लसीकरणासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्रास सुद्धा सहन करावा लागला.

सामान्यांना हुसकावून, व्हीआयपींना आमंत्रण

मागील अनेक दिवसांपासून तुकाराम हॉस्पिटल येथे व्हीआयपी लोकांना बोलावून लसीकरण करण्यात येत आहे तर दुसरीकडे सकाळी १० वाजेपासून रांगेत उभे राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दुपारी २-२ वाजेपर्यंत ताटकळत ठेवल्या नंतर ऐन वेळेवर हुसकावून लावण्याचा प्रकार श्री संत तुकाराम हॉस्पिटल येथे लसीकरण मोहिमे दरम्यान मागील अनेक दिवसांपासून अनुभवास येत आहे. या संदर्भात नगरसेवक विनोद मापारी यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. नायडू नामक कर्मचारी तर सरळ सांगतो की आमच्या येथे दुपारी २ नंतर व्हीआयपींचेच लसीकरण केले जाते व हॉस्पिटल आमच्या मालकीचे आहे तर नियम सुद्धा येथे आमचेच राहतील. तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करा की, कुठेही तक्रार करा, असा आरोप नगरसेवक मापारी यांनी केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने संबंधित तक्रार आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याकडे मापारी यांनी केली आहे. मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी सदर गंभीर बाबेची तत्काळ दखल घेत त्याठिकाणी भेट देऊन आजच्या आज चुकीचा प्रकार बंद न केल्यास हॉस्पिटलवर उद्याच कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

संपादन - विवेक मेतकर