Rahul Gandhi : सावरकरांबद्दल पुराव्यांनिशी बोललो; राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi statement Talked about Savarkar with evidence maharashtra akola

Rahul Gandhi : सावरकरांबद्दल पुराव्यांनिशी बोललो; राहुल गांधी

अकोला : ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी पुराव्यानिशी बोललो, असे स्पष्ट करीत महाराष्ट्रातील शिंदे सरकारला ते आवडले नसेल तर त्यांनी भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी,’’ असे आव्हान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिले. भारत जोडो यात्रेदरम्यान वाडेगाव (जि. अकोला) येथे आज त्यांची पत्रकार परिषद झाली. सावरकर यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रातील ओळी राहुल गांधी यांनी वाचून दाखविल्या. सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वाद सुरू असतानाच आज त्यांनी सावरकर यांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्रच पुरावा म्हणून सादर केले.

‘‘आपण सावरकर यांच्याविषयी जे काही बोललो ते पुराव्यानिशी बोललो. सावरकर यांच्याविषयी भाजपला जे वाटते ते म्हणणे त्यांनी मांडावे. त्याला आमचा विरोध नाही. संविधानाने सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. आमचा मार्ग अहिंसेचा आहे. आम्हाला कोणाला दबावात ठेवायचे नाही. ‘भारत जोडो’ यात्रेचा उद्देशच द्वेषाच्या विरोधात आहे,’’ असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. इंग्रजांनी नेहरू, पटेल यांनासुद्धा तुरुंगात डांबले होते. मात्र, त्यांनी कधी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले नाही. सावरकर यांनी पत्र लिहून सुटकेसाठी दुसरा मार्ग निवडला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रात केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात आमच्या यात्रेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. विदर्भात खरी आणि नैसर्गिक काँग्रेस पाहायला मिळाली. महात्मा गांधी यांनी कर्मभूमी म्हणून विदर्भाची निवड का केली, याचेही उत्तर सर्वांना मिळाले. यात्रेमुळे महाराष्ट्राविषयी यापूर्वीचा राजकीय दृष्टिकोन बदलला, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मी भविष्यवेत्ता नाही भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला कितपत राजकीय फायदा होईल, या प्रश्नावर राहुल गांधी यांनी ‘मी भविष्यावेत्ता नाही’ असे उत्तर दिले. मात्र, फरक निश्चितच पडेल, असा दावा त्यांनी केला.

आजीचे पत्र वाचले नाही : शेलार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका पत्रात सावरकर यांना भारताचा सुपुत्र असे म्हटले आहे. परंतु सावरकरांबाबत बोलणाऱ्या राहुल गांधी यांनी आपल्या आजींचे पत्र वाचलेले नाही. त्यामुळे राहुल यांचे विधान हे बेअक्कलपणाचे आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही देशाची समस्या गांधी म्हणाले, की यात्रेमुळे शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेता आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही समस्या देशाची झाली आहे. अन्नदात्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर सरकारला धोरण ठरवावे लागेल. शेतकरी आत्महत्या आणि गरिबी दूर करण्यासाठी काँग्रेसकडे असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येकाच्या खात्यात सहा हजार रुपये महिना याप्रमाणे वर्षाला ७२ हजार जमा केले जातील. त्यामुळे कोणीच गरीब राहणार नाही. शेतकऱ्यांवरचा तणाव कमी होईल. कोणी आत्महत्या करणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भारत जोडो यात्रा रोखण्याची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद उमटून राजकारण तापले. या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाने भारत जोडो यात्रा रोखण्याची मागणी केली.

राहुल गांधी यांच्याविरुद्ध मुंबईत तक्रार

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक करावी, अशी मागणी करत सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.