esakal | गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नावाने शहरातील नामांकित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला १० लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेतील तत्कालीन पाचही पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

वाशीम बायपास परिसरातील विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ यांच्याकडील वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पाच पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गृहमंत्र्यांच्या नावानी १० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार आसिफ यांनी केली होती. त्यांचे तीन ट्रक बळजबरीने एलसीबी आवारात गैरकायदेशीर उभे करून ठेवले आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी देत राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नावाने १० लाखांची मागणी केल्याचे आसिफ यांनी तक्रारीत म्हटले होते.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

या तक्रारीची प्रतिलिपी पंतप्रधान, परिवहन मंत्री, पोलिस महासंचालक, अमरावती विभाग पोलिस महानिरीक्षक, अकोला जिल्हा पोलिस यांनाही दिली होती. मात्र, पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस महानिरीक्षकांकडूनही या प्रकरणाची चौकशी झाली. दरम्यानच्या काळात खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेतून बदली झाली.

तत्कालीन पोलिस निरीक्षक शैलेस सपकाळ यांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली. आसिफ यांनी या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून वारंवार संबंधितांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. मात्र, कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तथ्य व परिस्थितिजन्य पुरावे ग्राह्य धरून जयंता श्रीराम सोनटक्के, किशोर काशीनाथ सोनावणे, वसिमोद्दिन अलिमोद्दिन, अश्विन हरिप्रसाद मिश्रा व इतर एक यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याचिककर्त्यांकडून ॲड. नजीब शेख यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात आता पोलिस न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करतात का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top