esakal | सोयाबीनला विक्रमी भाव; तूर, हरभराही जोरदार

बोलून बातमी शोधा

सोयाबीनला विक्रमी भाव; तूर, हरभराही जोरदार
सोयाबीनला विक्रमी भाव; तूर, हरभराही जोरदार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः एरव्ही हमीभाव सुद्धा मिळत नसलेल्या सोयाबीनला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपर्यंतचा उचांकी व विक्रमी भाव मिळत आहे. हरभरा व तुरीनेही हमीभावाला मागे टाकत भावामध्ये जोरदार चढाई केली आहे.

दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे सोयाबीन, तूर, हरभरा पिकाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. सोबतच व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी दराने म्हणजे दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच सोयाबीन, हरभऱ्याची व तीन ते चार हजार रुपये दराने तुरीची खरेदी होत असल्याने सोयाबीन, तूर, हरभरा उत्पादकांना सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे. शासनाच्या हमीभाव केंद्रावर सुद्धा या पिकांची विक्री करताना शेतकऱ्यांना विविध अटी, शर्तीची पुर्तता करावी लागते.

त्यातही कोणत्याना कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्पादनाची खरेदी होत नाही व झाली तरी, चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांना महिनो प्रतीक्षा करावी लागते. यावर्षी मात्र, या तिन्ही प्रमुख पीक उत्पादनाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भक्कम भाव मिळत आहे. शनिवारी (ता.१७) सुद्धा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला आजपर्यंतचा उचांकी व विक्रमी ७२५० रुपये भाव मिळाला. हरभरा, तुरीनेही हमीभावाला मागे सोडले असून, शनिवारी हरभऱ्याला ५४०० तर, तुरीला ७३०० रुपये भाव मिळाला.

हमीभाव केंद्रांकडे पाठ

व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नसल्याने, किमान हमीभाव तरी मिळावा म्हणून शेतकरी त्यांचा शेतमाल शासनाच्या हमीभाव केंद्रावर विक्री करण्यासाठी दरवर्षी रीघ लावतात. यावर्षी सुद्धा हजारो तूर, सोयाबीन, हरभरा उत्पादकांनी हमीभाव केंद्रांवर शेतमालाची ऑनलाइन पूर्व नोंदणी केली. परंतु, बाजार समितीमध्ये नगदी व हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने, हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्रावर एकाही तूर उत्पादक शेतकऱ्याकडून खरेदी झाली नाही.

सोयाबीनचा पेरा वाढणार

गेल्या हंगामातील सोयाबीन उत्पादनाला सध्या सात हजाराहून अधिक भाव मिळत आहे. यापुढेही सोयाबीनची मागणी वाढणार आहे. त्यामुळे येत्या खरिपात शेतकऱ्यांची सोयाबीन पेरण्यासाठी सर्वाधिक पेरणी राहणार असून, कृषी विभाग, महाबीजद्वारे सुद्धा त्या दृष्‍टीने बियाणे उपलब्धतेबाबत नियोजन आखले जात आहे.

संपादन - विवेक मेतकर