
कोविड लसीकरणासाठी नोंदणी पंधरवाडा राबवणार - बच्चू कडू
अकोला ः वय वर्षे १८ ये ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविडचे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता कोविन ॲप किंवा आरोग्य सेतूच्या माध्यमातून लसीकरण नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विशेष करून ग्रामीण भागात लसीकरण नोंदणीकरिता पंधरवाडा मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनास दिले. जिल्ह्यात आता ग्रामीण भागातही कोविड संसर्गाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तेव्हा ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष द्या, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कोविड-१९ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.
राज्यात ता. १ मेपासून वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना उपलब्धेनुसार मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात लसीकरणाच्या नियोजनाबाबत आढावा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी घेतला. यावेळी त्यांनी सूचना दिल्या की, लसीकरण करण्याकरिता जास्तीत जास्त नोंदणी व्हावी याकरिता जनजागृती अभियान राबवावे. विशेष करून ग्रामीण भागात नोंदणी करण्याकरीता प्रोत्साहित करावे. याकरीता त्याच्या मदतीला ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल व कृषि सेवकांच्या सहायाने ग्रामस्तरावर नोंदणी पंधरवाडा मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. अशा पद्धतीने नोंदणी करुन नंतर दिलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण झाल्यास लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही . त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची विशेषतः जे लोक मोबाईल, स्मार्ट फोन वरुन नोंदणी करु शकत नाही, अशा लोकांची नोंदणी करून घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.
कोविड-१९चा फैलाव आताग्रामीण भागात जादा होतांना दिसत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना अधिक कडक कराव्यात. लग्न समारंभाकरीता देण्यात आलेल्या अटीशर्तीचे पालन होत नसल्यास संबंधित व्यक्ती व मंगलकार्यालय चालकांवर कडक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी पोलिस यंत्रणेस दिले. जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धेबाबत आढावा घेवून ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीनुसार ऑक्सिजन निर्मितीकरिता नियोजन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेस दिले. तसेच कोरोना रुग्णास चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या. रुग्णालयाच्या ठिकाणी स्वच्छता व जेवणाची व्यवस्था उत्तम राहिल यांची दक्षता घेण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
संपादन - विवेक मेतकर
Web Title: Registration For Kovid Vaccination Will Be Done Fortnightly Bachchu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..