esakal | कोरोनापासून दिलासा; मृत्यूसह ॲक्टिव्ह रुग्ण घटले
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

कोरोनापासून दिलासा; मृत्यूसह ॲक्टिव्ह रुग्ण घटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात गत आठवड्याभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत सतत घट आहे. त्यामुळे कोरोनाची मगरमिठी सैल झाल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने सध्या जिल्ह्यात केवळ ४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यासोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. (Relief from Corona; Active patients decreased with death)

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर २०२० या महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर झाले होते. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ६० वर जावून पोहचली होती. कोरोना मृत्यूचा दर सप्टेंबर महिन्यासह इतर महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून आले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट म्हणून या काळात नव्या व्हेरियंटची माहिती सर्वांना झाली. दरम्यान आता दुसरी लाट ओसरली असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे.

हेही वाचा: ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट


दोघांना डिस्चार्ज; एकच नवा रुग्ण
कोरोना संसर्ग तपासणीने सोमवारी (ता. १२) जिल्ह्यात ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ११८ निगेटिव्ह तर आरटीपीसीआरच्या चाचणीत एक अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिडच्या चाचणीत एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. याव्यतिरिक्त रुग्णालयातून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.

रिकव्हरी रेट ९७.४ टक्के
जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) ९७.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण बरे होण्याचे संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे दुसरी लाट संपूर्ण ओरल्याचे दिसून येत आहे, ही बाब सर्वांसाठी दिलासादायक ठरत आहे.


कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७६८९
- मयत - ११३०
- डिस्चार्ज - ५६५१६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४३

Relief from Corona; Active patients decreased with death

loading image