esakal | रेमडेसिव्हिरचा साठा संपला; रुग्णांचे हाल

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हिरचा साठा संपला; रुग्णांचे हाल
रेमडेसिव्हिरचा साठा संपला; रुग्णांचे हाल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या रेमडेसिव्हीरचा जिल्ह्यातील साठा शुक्रवारी (ता. ३०) संपला. त्यामुळे रेमडेसिव्हिरच्या शोधात रुग्णांच्या नातेवाईकांना पायपिट करावी लागली. शहरातील एकाही मेडिकल स्टोअरवर रात्रीपर्यंत रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा जीव कंठाशी आला तर त्यांच्या नातेवाईकांची फरफट झाली.

राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात गत वर्षापासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर सध्या तरी लसीकरणा व्यतिरिक्त इतर कोणताही रामबाण उपचार नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. असे असले तरी अद्याप लसीकरणाची गती कमी असल्याने व संसर्गाचा वेग अधिक असल्याने ऑक्सिजन, खाटा व इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा भासत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन बहुतांश उपयोगी सिद्ध होत असल्याने गत एका महिन्यापासून संपूर्ण राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा ही अल्प आहे.

त्यामुळे रुग्णांची हाल होत असून त्यांच्या नातेवाईकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान शनिवारी (ता. ३०) महानगरातील एकाही मेडिकल स्टोअरवर रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. रेमडेसिव्हिरचा साठाच उपलब्ध नसल्याने कोरोनामुळे प्राण कंठाशी आलेल्या रुग्णांचे अतोनात हाल झाले. दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी सर्व मेडिकलवर पायपिट केल्यानंतर सुद्धा त्यांना निराश व्हावे लागले. प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना या विषयी माहिती असल्यानंतर सुद्धा ते हतबल असल्याचे दिसून आले.

पुरवठ्यावर अनिश्चितता

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची शुक्रवारी (ता. ३०) दिवसभर एकही कुपी (व्हायल) जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची माहिती प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना होती. शुक्रवारी रात्री इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतरच रुग्णांना इंजेक्शन मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रेमडेसिव्हिर उपलब्ध नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरची व्यवस्था व्हावी यासाठी नागपूर येथून काही इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु त्यात वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर