वाचा काय आहे आरटीईची स्थिती; किती विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश

सुगत खाडे
Saturday, 11 July 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक लागलेल्या आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेची लगबग सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी लॉटरी लागलेल्या शाळांमध्ये जावून कागदपत्रांची पडताळणी सुरु केली आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत आतापर्यंत 112 विद्यार्थ्यांना निश्‍चित प्रवेश मिळाला असून 554 विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. 

अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक लागलेल्या आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेची लगबग सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी लॉटरी लागलेल्या शाळांमध्ये जावून कागदपत्रांची पडताळणी सुरु केली आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत आतापर्यंत 112 विद्यार्थ्यांना निश्‍चित प्रवेश मिळाला असून 554 विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. 

या वर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील 201 शाळांमध्ये दोन हजार 323 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू झाली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ( 4 मार्च) जिल्ह्यातील 7 हजार 333 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते, परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार 323 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार 10 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. 

राज्यस्तरावर काढली लॉटरी 
दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव असल्याने आरटीईसाठी 17 मार्चरोजी राज्यस्तरावर व्हीसीद्वारे (व्हिडीओ कॉन्फ्रेंसिग) सोडत काढण्यात आली. लॉटरी लागलेल्यांना 20 मार्चरोजी एसएमएस मिळाले होते. त्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आरटीईचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. दरम्यान आता त्याला गती मिळाली आहे. 

दृष्टीक्षेप आरटीई प्रवेशावर 
आरटीई शाळा - 201 
आरटीई जागा - 2323 
ऑनलाईन प्रवेश अर्ज - 7333 
क्षमतेपेक्षा जास्त प्राप्त अर्ज - 5010 
निश्‍चित झालेले प्रवेश - 112 
तात्पुरते प्रवेश - 554 

कागदपत्रे शाळेत सादर करा
सध्याच्या काळात आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रकात नूमद केले आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताणी करुन व संकलन करावे. त्यानंतर पडताळणी समितीच्या मान्यनेते प्रवेश देण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rte admission almost started; speed ​​up the process in akola