
आरटीईचे प्रवेश प्रलंबित; प्रक्रियेला मुदतवाढ
अकोला - आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दूसरी घेरी नुकतीच पार पडली. या फेरीत प्रतीक्षा यादीतील १२८ विद्यार्थ्यांच्या पालकांना खासगी शाळेत प्रवेशासाठी लॉटरी लागली. परंतु दोन फेऱ्यांत निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील एकूण ५५९ विद्यार्थ्यांपैकी अद्याप केवळ २८४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश मिळाल्याने उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २८ जून पर्यंत संधी देण्यात आली आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.
दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आली. त्यासोबतच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची निवड लॉटरी काढून शासन स्तरावरून करण्यात आली आहे. लॉटरीमध्ये निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली. परंतु आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीची दूसरी फेरी काढण्यात आली असून त्यात १२८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली. संंबंधितांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना खासगी शाळेत प्रवेश देण्यात येईल.
अशी आहे आरटीईची स्थिती
नोंदणीकृत शाळा - १९६
आरक्षित जागा - १९९५
प्राप्त अर्ज - ६००३
जास्त प्राप्त अर्ज - ४००७
प्रतीक्षा यादीतील निवड - ५५९
प्रवेशित विद्यार्थी - २८४
Web Title: Rte Admission Pending Extend The Process
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..