esakal | वीज निर्मिती केंद्रात कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री उभारा! - बच्चू कडू

बोलून बातमी शोधा

वीज निर्मिती केंद्रात कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री उभारा! - बच्चू कडू
वीज निर्मिती केंद्रात कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री उभारा! - बच्चू कडू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची गुरुवारी (ता. २२) दुपारी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर ठिकाणावरुन कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी वीज निर्मिती केंद्रात कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री उभारण्याचे निर्देश दिले. त्यामुळे तांत्रीक तज्ज्ञांचे पथकाने दिवसभरात या ठिकाणी पाहणी करुन त्यासंबंधिचा अहवाल पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्‍याने वाढत आहे. सदर रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांना पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून कृत्रीम ऑक्सिजन मिळवता येईल का, यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. २२) पारस वीज निर्मिती केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत विभागीय आयूक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल रहाटे आदींचा समावेश होता. येथील ओझोन वायु निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन त्याची जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करण्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

------------------------

ऑक्सिजन सिलींडरमध्ये भरण्याची व्यवस्था नाही

पारस येथील औष्णिक वीज केंद्रात निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्र सामुग्री येथे उभारल्यास येथून ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. यासाठी तातडीने तांत्रिक तज्ज्ञांचे पथकाने दिवसभरात पाहणी करुन अहवाल द्यावा, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी येथे दिले.

----------

कोविड केअर सेंटररसाठी जागेची व्यवस्था

पारस औष्णीक वीज निर्मिती केंद्र परिसरात असलेल्या प्रकल्प विभागाच्या जागेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठीही त्यांनी पाहणी केली. या जागेत विद्युतीकरण, लाईट, पंखे, पाण्याची सोय आहे. त्यामुळे याठिकाणी हॉल मोकळा करुन रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली तर या जागेचा कोविड केअर सेंटर म्हणून उपयोग करता येईल, त्यासाठी तातडीने स्वच्छता व आवश्यक बाबींची कार्यवाही करावी, अशा सूचनाही कडू यांनी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

संपादन - विवेक मेतकर