‘लालपरी’ थांबल्याने खासगीला ‘अच्छे दिन’ | Lalpari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेगाव : ‘लालपरी’ थांबल्याने खासगीला ‘अच्छे दिन’

शेगाव : ‘लालपरी’ थांबल्याने खासगीला ‘अच्छे दिन’

शेगाव : ऐन गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने लालपरीची चाके थांबली असून, ऐन सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यामुळे खासगी वाहतुकीला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येते. एसटी बंद असल्‍याने संतनगरी शेगावात येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केल्याने शेगावतून एकही बस सुटली नाही. पर्यायाने प्रवाशांना खाजगी वाहतुकीतून प्रवास करावा लागला. यावेळी खासगी वाहतुकीने प्रवाशांना सेवा देत मदतीची भूमिका निभावल्याने याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले. काही अपवादात्मक खासगी वाहनधारकांकडून जास्तीचे भाडे आकारणी होत असल्याचेही आढळल्याने याबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: नागपूर : छोटे उद्योग अडचणीत

वाहन मिळत नसल्याने तारांबळ

एसटी महामंडळाच्या बेमुदत आंदोलनामुळे सर्व ठिकाणच्या बसफेऱ्या बंद आहेत. ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढल्याने खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनात गर्दी होत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.

‘अपडाउन’चे गणित कोलमडले

बाहेरगावाहून येणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी बहुतांश एसटीने प्रवास करतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सदर कर्मचारी मिळेल त्या वाहनातून प्रवास करीत आहेत.

व्यावसायिकांचा रोजगार बुडाला

बसस्थानक परिसरात शीतपेय, स्टेशनरी, झेरॉक्स दुकान, न्यूज पेपर, सलून दुकान यासह अनेक दुकाने आहेत. तसेच एसटीत अनेक वस्तू विक्री करणारे कामगारदेखील आहेत. लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या तसेच तालुक्यातील फेऱ्या यामुळे बसस्थानकात प्रवाशांची रेलचेल सुरू असते. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या बेमुदत आंदोलनामुळे व्यावसायिकांसह कामगारांची दिवाळी बुडाल्याचे दिसून आले.

loading image
go to top