आरटीईच्या सहाशे जागा रिक्तच!, 1 हजार 731 विद्यार्थ्यांच्या पालकांनीच घेतले निश्चित प्रवेश

सुगत खाडे  
Monday, 7 September 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशीराने सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप केवळ एक हजार ७३१ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला असल्याने आरटीई कोट्‍यातील ५९२ जागा रिक्त आहेत. परिणामी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आरटीई प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवल्याने पालकांकडे प्रवेशासाठी आणखी दहा दिवस शिल्लक आहेत.

अकोला :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशीराने सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप केवळ एक हजार ७३१ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला असल्याने आरटीई कोट्‍यातील ५९२ जागा रिक्त आहेत. परिणामी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आरटीई प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवल्याने पालकांकडे प्रवेशासाठी आणखी दहा दिवस शिल्लक आहेत.

यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. दरम्यान प्रवेशाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आता प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप केवळ १ हजार ७३१ निश्चित प्रवेश झाले असून एक हजार १८७ तात्पुरते प्रवेश झाले आहेत.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ‘प्रतीक्षाच’
आरटीई प्रवेशासाठी २ हजार ३२३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्यस्तरावर सोडत (लॉटरी) काढण्यात आली. सोडतीमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी एक हजार ७३१ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाला असून एक हजार १८७ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्यांसाठी प्रवेशाची शेवटची तारीख वाढवल्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six hundred vacancies of Akola News RTE are vacant! Only parents of 1,731 students have taken definite admission