सोशल गॅदरींग ठरतेय कोरोना उद्रेकाला कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

लहान-सहान कार्यक्रमांत झाला कोरोनाचा फैलाव ः अकोलेकरांनो कोरोनाचा धोका ओळखा

अकोला ः अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या हजाराकडे आगेकूच करीत आहे. सोबतच मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. हेच प्रमाण रोखण्यासाठी सरकाने दुःखद आणि आनंदाच्या कार्यक्रमांसाठी किती जण उपस्थित रहावे याचे नियम घालून दिलेले असले तरी अकोल्यात काही ठराविक परिसरात झालेल्या ‘सोशल गॅदरींग’मुळे कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. तरी अकोलेकरांनी कोरोनाचा धोका ओळखून प्रशासनाला मदत करणे गरजेचे आहे. 

टाळेबंदीनंतर सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून अनलॉक सुरू केले आहे. मात्र, असे जरी केले असले तरी काही गोष्टींवर निर्बंध अद्यापही कायम आहेत. त्यासाठी नियम घालून देण्यात आले आहेत. ऐवढेच नव्हे तर त्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. यातीलच एक प्रकार म्हणून दुःखद वा आनंदी प्रसंगाला किती जणांनी उपस्थित रहावे हे ठरवून दिले आहे. मात्र, या नियमांचे पालन पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे. आणि याच बेफिकरीमुळे अकोल्यात रुग्णसंख्या वाढीला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा नागरिकांनी काही दिवस तरी काही ठराविक कार्यक्रम पुढे ढकलले किंवा कमी व्यक्तीत साजरे केले तर काही बिघडणार आहे का? असा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे.

या कार्यक्रमांनी वाढविले प्रतिबंधित क्षेत्र
अकोला शहरात काही असे ठराविक प्रतिबंधित क्षेत्र आहेत की, केवळ काही ठराविक कार्यक्रमांमुळे तिथे कोरोनाचे रुग्ण आढळले आणि त्यांचा समावेश प्रतिबंधित क्षेत्रात झाला. बारसं, हळदीचा कार्यक्रम, डोहाळे जेवण आणि कुटुंबियांचा साजरा केलेला वाढदिवस या आणि इतर कार्यक्रमांसाठी लोक एकत्रित जमले आणि कोरोनाचे संक्रमण झाले. तेव्हा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास आपला कोरोनापासून बचाव होऊ शकते असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

नसाल ऐकत तर मग पुन्हा टाळेबंदी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नागरिकांनी विनाकरण गर्दी करू नये, जर ऐकले नाही आणि कोरोनाचे रुग्ण वाढतच राहिले तर 30 जून नंतर पुन्हा टाळेबंदी केली जाईल असा इशारा दिला होता. तेव्हा अकोलेकरांनी या इशाऱ्याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, नाही तर पुन्हा टाळेबंदीत अडकून बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social gatherings lead to corona eruptions