Akola | कापसाच्या झाल्या वाती, उडिदाला फुटले कोंब! सोयाबीनही गेले मातीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापसाच्या झाल्या वाती

कापसाच्या झाल्या वाती, उडिदाला फुटले कोंब! सोयाबीनही गेले मातीत

अकोला : पावसाळ्यात सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि केले दोन दिवसांतील मॉन्सुनेत्तर मुसळधार पावसाने शेतात कापसाच्या वाती झाल्यात तर उडीदाला कोंब फुटले आहे. सोयाबीन मातीत गेले. शेत रस्त्यांवर चिखल साजल्याने शेतात जाणेही कठीण झाले आहे. या पावसाने खरीपातील पिकं मातीमोल झाले असून, केवळ शेतीवर प्रपंच असलेल्या शेतकरी कुटुंबांनी उरनिर्वाह चालवावा कसा असा प्रश्न पडला आहे. तेल्हारा तालुक्यात एकूण १०८ गावे आहे. तालुक्यातील शेती कसदार आहे. त्यात तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी केळी, संत्रा, टोमाटो, कापूस, सोयाबीन, मूग आदी पीक प्रामुख्याने घेतात. तालुक्यातील बहुतांश गावात शेतात जाण्यासाठी शेतरस्ते नसल्याने थोडा जरी पाऊस आला तरी शेतातील पीकं घरी आणता येत नाही.

यावर्षी सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने पेरणी उशिरा झाली. मात्र, बागायतदार शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड केली होती. सलग दोन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने शेतातील कपाशी बोंड्या सडल्या होत्या. त्यामुळे कापूस उत्पादन घटले तर मूग पिकांवर आलेल्या किडीने हे पीकंही हातचे गेले. त्यानंतरही शेतकरी खचला नाही; मात्र या आठवड्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेत रस्ते चिखलमय झाले. पावसामुळे शेतातील पीक घरी आणण्याचे मार्गच बंद झाले. पाऊस बंद झाला असला तरी आठवडाभर रस्त्यावरून चालणेही कठीण आहे. त्यामुळे शेतातील पीक घरी आणण्यासाठी आणखी आठवडाभर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा: पुणे : सार्वजनिक आरोग्याला आता इंटेलिजन्सची साथ

शेत रस्त्यांना मंजुरी, कामेही प्रस्तावित...पण!

महसूल विभागाने सन २०२१ मध्ये १३० गावांतील शेत रस्ते प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३४ शेतरस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यावर्षीही १२० शेत रस्ते प्रस्तावित होते. त्यापैकी जवळपास १०० शेत रस्ते मंजुरी मिळाली. दिवाळी नंतर शेत रस्ते कामास सुरुवात होईल, अशी माहिती तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी तेल्हारा तालुक्यातील सत्तावीस गावात स्वतःहा शेत रस्ते करून दिले होते.

मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनीधी आहेत कुठे?

निवडणूक आली की मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी आहेत कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अकोट-तेल्हारा तालुक्याचा समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनीही शेत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मी चार एकर उडीद पेरणी केली आहे. उडीद सोगंणीला आला असताना दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतात जाण्यासाठी असलेल्या शेत रस्त्यावर चिखल झाला आहे. पायीही चालता येत नाही. तेथे पीक घरी कसे आणावे, हा प्रश्नच आहे. एकदा का पाऊस आला की पंधरा दिवस तळेगाव बाजार ते बेलखेड रस्त्यावर वाहन चालत नाही. त्यामुळे उडिदाच्या शेंगांना शेतातच कोंब फुटले आहे. शासनाने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत रस्ते तयार करून द्यावे.

- मनोज राऊत, शेतकरी, तळेगाव बाजार

टॅग्स :Akola