सार्वजनिक आरोग्याला आता इंटेलिजन्सची साथ | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Public-Health-Scheme

पुणे : सार्वजनिक आरोग्याला आता इंटेलिजन्सची साथ

पुणे : कोरोनासारख्या वैश्विक साथीची तीव्रता पाहता, येत्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ असने महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेला तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड असने अनिवार्य आहे. रोगांचे विश्लेषण, उपचार, व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी अशा व्यवस्था निर्णायक भुमिका बजावतात. म्हणूनच महापालिकेने 'पुणे पब्लिक हेल्थ इंटेलिजन्स हब' (पीपीएचआयएच) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पीपीएचआयएच’च्या माध्यमातून माहिती विश्लेषण आणि समन्वयाचे काम केले जाईल. यासंदर्भातील प्राथमिक अभ्यास 'सीपीसी अॅनॅलिटिक्स' या बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनीने केले आहे. ‘कॅपिटालँड इंडिया’ या कंपनीच्या साह्याने हा अभ्यास करण्यात आला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी निकराचे प्रयत्न करत असतानाच पुणे महापालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यासाठी उपाययोजना करण्यासही सुरुवात केली. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी रुग्णांची माहिती गोळा करणे आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे इथपर्यंतच उपाययोजना मर्यादित ठेऊन भागणार नाही. यासाठी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये आजून समन्वय असण्याची गरज आहे, असा निष्कर्ष पुणे महापालिकेने अभ्यासांती काढला. त्या आधारावरच ‘पीपीएचआयएच’ उपक्रम सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : लॉकडाऊनच्या नावाखाली राज्य सरकारने अडवल्या नियुक्त्या

पीपीएचआयएच काय करणार?

- शहरातील लोकसंख्या, आरोग्य यंत्रणा, आदी माहितीचे संकलन करणार

- त्याआधारे नागरिकांच्या आरोग्याविषयीचे तपशीलवार चित्र उभे करणार

- माहिती विश्लेषणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कळीची माहिती आरोग्य यंत्रणेला पोचवली जाणार

- ‘पीपीएचआयएच' सार्वजनिक व खासगी रुग्णालयांमध्ये समन्वय साधण्यास मदत करेल.

- डेंग्यूचे निर्मूलन, साथीचे रोग आणि इतर आरोग्यविषयक संकटांमध्येही शास्त्रोक्त उपाय आणि धोरणे ठरविण्यास मदत करणार

- आजार रोखणे, आजाराची परिणामकारकता कमी करणे आणि तातडीने प्रतिसाद देणे हे प्राथमिक लक्ष्य असेल.

विविध विभागांमध्ये डिजिटल प्रणालींचा वापर करून कामकाज अधिक वेगवान, अचूक, प्रभावी आणि पारदर्शक करण्यास पुणे महापालिकेने आघाडी घेतली आहे. पुणे शहरातील आरोग्यविषय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने सखोल आढावा घेतला. ‘पीपीएचआयआच’ची स्थापना हे योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. यातून शहरातील आरोग्यविषयक गरजा आणि उपलब्ध यंत्रणा यांची योग्य सांगड घातली जाणार असून त्यातून आरोग्ययंत्रणा सुदृढ होण्यास मदत होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

टॅग्स :Pune News