Akola : स्टेट बँक व एटीएम फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

Akola : स्टेट बँक व एटीएम फोडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

बर्शीटाकळी : स्थानिक पोलिस स्टेशनपासून दहा-बारा किमी. अंतरावर असलेल्या धाबा येथील स्टेट बँकच्या शाखेत आणि एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना ता. ५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. एटीएमच्या मुंबई येथील मुख्य शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या आवाराचे गेटची साखळी कुलूप ताडून बॅंकेच्या मुख्य इमारतीचे मुख्य गेटचे कुलूप तोडून दरोडा करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्याची घटना घडल्याने स्थानिक पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. चोरट्यांनी बँकेच्या शेजारील असलेल्या शाखेच्या एटीएम मशीनच्या मागील बाजूस असलेले लॉकर तोडण्याचाही प्रयत्न केला.

एटीएममध्ये काही सशंयीत हालचाली होत असल्याचे संकेत एटीएमच्या मुंबई येथील मुख्य शाखेस सीसी कॅमेऱ्यात दिसून आल्याने सदर घटनेबाबतची माहिती संबंधितांनी थेट बार्शीटाकळीचे पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांना फोनव्दारे दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सोळंके यांनी क्षणाचीही विलंब न लावता आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले.

परंतु, तोपर्यंत वेळ निघूण गेला आणि दोन अज्ञात चोरटे घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाले. दोन चोरटे बार्शीटाकळीच्या दिशेने भरधाव वेगाने गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी ठाणेदारांना दिली. या घटनेमुळे चोरांच्या हिम्मती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय अधिकारी, ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळ गाठले. या ठिकाणी दोन वेळा दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला; मात्र पोलिसा प्रशासन साखर झोपेतून कधी जागे होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिस फक्त आठवड्यातून एकदा

बार्शीटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धाबा पोलिस चौकीत धाबा आणि राजंदा, अशा दोन बीट आहेत; मात्र या दोन्ही बीटचे पोलिस कर्मचारी रात्री आपल्या कर्तव्यावर हजर राहत नसल्याने या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे सदर पोलिस चौकी शोभेची वास्तू बनली असून, येथील पोलिस कर्मचारी फक्त बाजाराच्या दिवशीच दिसून येतात असल्याचे धाबा येथील ग्रामस्थांनी सांगितले.

पोलिसांसमोरून चोरटे फरार!

मुंबईवरून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी पोलिस घटनास्थळी धाव घेत असतानाच दोन दुचाकीस्वार एक दुचाकी घेऊन भरधाव वेगाने निघूण गेले. परंतु, ती दुचाकी कोणाची आणि त्यावर स्वार कोण याची काहीच कल्पाना नसल्याने पोलिसांनी त्यांना ओळखता आले नाही आणि घटनास्थळ गाठण्याचे पोलिसांचे ध्येय असल्याने पोलिसांसमोरून चोरटे फरार होण्यास यशस्वी झाले.

दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धाबा येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्यांच्या वाहनाला क्रॉस झालेल्या दुचाकीचा पाठलाग केला. दुचाकी भरधाव वेगाने असल्याने चांदुर-खडकीजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाल्याने दोन्ही आरोपी जखमी झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि उपचाराकरिता सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :BankAkolaATM MachineATM