शिक्षण विभागाचे वराती मागून घोडे!; विद्यार्थ्यांना आता मिळणार...

सुगत खाडे
Monday, 3 August 2020

उन्हाळ्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित ठेवत विद्यार्थ्यांना आता पावसाळ्यात उन्हाळ्यातील पोषण आहार देण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयास दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना उशीराने 34 दिवसांचा पोषण आहार मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. असे असले तरी ही बाब म्हणजे वराती मागून घोडे काढण्यात येत असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अकोला : उन्हाळ्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित ठेवत विद्यार्थ्यांना आता पावसाळ्यात उन्हाळ्यातील पोषण आहार देण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयास दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना उशीराने 34 दिवसांचा पोषण आहार मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. असे असले तरी ही बाब म्हणजे वराती मागून घोडे काढण्यात येत असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

विदर्भात 26 जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरुवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्‍चित वेळापत्रक नाही. परंतु कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन स्तरावरुन संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.

त्याअंतर्गत टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु यासर्व प्रक्रियेनंतर सुद्धा शालेय पोषण आहारा संदर्भात शासन व प्रशासन स्तरावरून कोणत्याच प्रकारचे निर्देश शिक्षण विभागाल प्राप्त झाले नव्हते. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणाऱ्या पोषणाला सुद्धा कोरोना ग्रहण लागल्याचे दिसून येत होते. परंतु आता शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीच्या कालावधीतील पोषण आहार देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

असा मिळेल पोषण आहार

 

  •  इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूगडाळ 600 ग्राम, हरभरा 1 किलो 200 ग्राम व तांदुळ तीन किलो 400 ग्राम मिळणार आहे. 
  • इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मूगडाळ 900 ग्राम, हरभरा 1 किलो 800 ग्राम व तांदुळ 5 किलो 100 ग्राम देण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांना मूगडाळ व हरभरा पॅकिंग स्वरुपात देण्यात येईल. 

अशी विद्यार्थी संख्या (2019 च्या संचमान्यतेनुसार) 

  • जिल्ह्यात खासगी शाळा वगळता एकूण 1 हजार 228 शाळा आहे. या शाळांमध्ये गत वर्षी वर्ग 1 ते 5 चे 91 हजार 415 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 
  • जिल्ह्यात वर्ग 6 ते 8 शाळांची संख्या 782 आहे. या वर्गांमध्ये 63 हजार 284 विद्यार्थी शिक्षण घेत होते. संबंधित विद्यार्थ्यांना टाळेबंदीपासून पोषण आहाराचे वाटप बंद आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students will now get nutritious food for the summer holidays in akola