esakal | मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासासाठी सुप्रिया सुळेंनी उचलले पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

sindkhedraja meeting

मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासासाठी सुप्रिया सुळेंनी उचलले पाऊल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजाच्या विकासाकडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना परिस्थिती कथन करीत कामाला नवसंजीवनी देण्याची मागणी केली. त्यावर अजितदादा पवार यांनी बैठकही बोलावली होती.मातृतीर्थ सिंदखेडराजासह अजिंठा, वेरूळ, दौलताबाद येथील ऐतिहासिक व पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने विकास कामासंदर्भात ७ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयांत बैठक झाल्याचे कळते.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळाबद्दल फोटोग्राफ्स दाखवून त्यासंदर्भात सविस्तरपणे माहिती दिली होती. त्यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः सिंदखेड राजाला येऊन ऐतिहासिक स्थळांची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्या आल्या आणि परिसराला भेट देऊन सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक वास्तूच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून लवकरच बैठकीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

त्यानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून ऐतिहासिक स्थळांचा विकास होण्याच्या दृष्टीने परिसराचे सुशोभीकरण करणे, परिसर विकास करणे व विकास आराखड्यासंदर्भात, केंद्र व राज्याच्या विविध खात्यात मधला समन्वय अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रात नमुद केले होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्राची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,सुभाष देसाई पालकमंत्री औरंगाबाद, डॉ. राजेंद्र शिंगणे पालकमंत्री बुलडाणा, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव नियोजन, अपर मुख्य सचिव वित्त, अपर मुख्य सचिव ग्रामविकास, सचिव बांधकाम विभाग, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच जिल्हाधिकारी, नगर परिषद अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित राहणार होते.

तारीख २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे भेट देऊन सर्व स्थळांची पाहणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी येथील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असून यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यटन मंत्री यांच्या समवेत बैठक घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यानुसार आज ही बैठक संपन्न झाली.

loading image
go to top