esakal | ‘लिंकींग’ करुन विक्री करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करा!
sakal

बोलून बातमी शोधा

‘लिंकींग’ करुन विक्री करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करा!

‘लिंकींग’ करुन विक्री करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः खरिप हंगामाच्या तयारीचा भाग म्हणून शेतकरी बियाणे, खतांची खरेदी करत असतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते विक्री करताना विक्रेते हे ‘लिंकींग’ करुन अनावश्यक खतेही बळजबरी खरेदी करावयास लावतात, तेव्हा खते खरेदी करताना लिंकींग करुन विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास, अशा विक्रेत्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी (ता. २६) संबंधित यंत्रणांना दिले.

यासंदर्भात जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकांतप्पा खोत, सहाय्यक व्यवस्थापक पणन सचिन कातखेडे, विभागीय व्यवस्थापक महाबीज जगदिशसिंह खोकड, जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, प्रभाकर मानकर, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे आदी उपस्थित होते.

अनावश्यक खतांचा वापर टाळावा

खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना अनावश्यक खत खरेदी करावयास लावू नये. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार तर सहन करावा लागतोच शिवाय अनावश्यक खते जमिनीत गेल्यास जमिनीचे आरोग्यही बिघडते. तरी खते विक्रेत्यांनी खतांची विक्री करतांना लिंकींग करु नये. अशा प्रकारे कुणी खत विक्रेता बळजबरीने लिंकींग करण्यास भाग पाडत असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रार करावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.

जुन्या साठ्‍याची विक्री जुन्या दराने करा!

जिल्ह्यात सध्या जो खतांचा साठा उपलब्ध आहे, तो जुन्या दरातील आहे. त्यामुळे या खतांची विक्री सुद्धा जुन्या दरानेच झाली पाहिजे, याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी बैठकीत दिले. तसेच शेतकऱ्यांनी जुन्या दराने खत खरेदी करावी, असे आवाहन ही करण्यात आले.

सोयाबीनचे बियाणे घरचे वापरा

जिल्ह्यात सोयाबीनची लागवड ही शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यातूनच करावी. फक्त त्या आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन हंगामात बियाणे व खतांची टंचाई भासू नये, तसेच त्याची उपलब्धता ही वेळेवर व किफायतशिर दरात व्हावी, याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष असावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

संपादन - विवेक मेतकर

loading image