लिपिक व नायब तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : लिपिक व नायब तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा

अकोला : लिपिक व नायब तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नायब तहसीलदार विनोद पाचपोहे व लिपिक जाधव या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी, मागणी तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. बुधवारी (ता.१७) या संदर्भात प्रभारी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

राज्य व केंद्र सरकातर्फे राज्यात गोरगरीब व निराधारांसाठी सरकारने विविध पेन्शन योजाना राबविल्या आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजाना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या तीन योजनेंतर्गत वृद्ध व निराधारांना अनुदान दिले जाते. योजेनेच्या प्रकारानुसार सहाशे ते एक हजारांचे अनुदान मिळते. मात्र, अनुदान मंजूर होऊनही एक वर्षापासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत करण्यात आले नाही. या विभागातील नायब तहसीलदार विनोद पाचपोहे व लिपिक जाधव हे दोघेही अनुदान जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत लाभार्थ्यांनी विचारपूस केल्यास त्यांना ‘तुम्ही वायंडर व सेतूवाल्यांना किती पैसे दिले’? असे, निरर्थक प्रश्न विचारून त्रास देण्यात येत आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक : प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करा

पदभार स्वीकारल्यापासून बैठकच घेतली नाही

नायब तहसीलदार विनोद पाचपोहे व जाधव हे दोघेही बार्शीटाकळी येथून बदलीवर बाळापूर तहसील कार्यालयात आले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकही बैठक घेतली नसून, एकाही लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करण्यात आली नाही. तसेच, राष्ट्रीय कुटुंब अर्थ साहाय्य योजनेचे अर्ज मंजूर होऊनही लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले नाही. त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या या दोघांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी अशी, मागणी रामकृष्ण सोनटक्के, गुलाब उमाळे, मंगेश गवई, रमेश हातोले, जयदेव हिवराळे व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

‘सकाळ’ वृत्ताची वंचित कडून दखल

बुधवारी (ता.१६) ‘सकाळ’ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताची वंचितने दखल घेतली असून, दोन-चार दिवसात निराधार योजनेच्या अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास वंचितकडून या दोन्ही अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचा इशारा वंचितचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top