प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करा | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश झगडे : ‘प्रशासनाचे अंतरंग’मधून साधला संवाद

नाशिक : प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करा

नाशिक : पत्रकारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्‍न, विकासासाठी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अभ्यास करून त्याद्वारे प्रशासनाला टोकदारपणे प्रश्‍न विचारावे. जेणेकरून जनसामान्यांना याबाबत माहिती मिळून त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल व प्रश्‍न सुटतील. प्रसारमाध्यमे किती प्रगल्भ यावर लोकशाहीचा पाया अवलंबून असल्याने प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करावी, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले.

विश्‍वास ज्ञान प्रबोधिनी अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्‍त विद्यमाने विश्वास हब येथे आयोजित कार्यशाळेत केले. ‘प्रशासनाचे अंतरंग’ विषयावर महेश झगडे यांनी माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर निवृत्त माहिती संचालक शिवाजी मानकर, विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे मार्गदर्शक डॉ. कैलास कमोद, विश्‍वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर उपस्थित होते. श्री. झगडे म्हणाले की, लोकांना सर्व माहिती मिळायला हवी, हा लोकशाहीचा उद्देश असला तरी प्रशासकीय यंत्रणेतील अनेक अधिकारी ही वस्तुस्थिती सर्वांपुढे आणत नाही.

हेही वाचा: जळगाव : खासगी, स्कूल बससह सातशेवर वाहने उपलब्ध

अनेक वेळा अधिकारी हे शासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांना आपले काम व अधिकारांचीदेखील पुरेशी माहिती नसल्याने अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकशाही कमकुवत होत चालली आहे. या सर्वांबरोबरच त्या भागातील माध्यमे किती प्रगल्भ आहेत यावर देखील लोकशाहीची पाया किती भक्कम आहे समजते. प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचे काम खऱ्या अर्थाने माध्यमे करत असतात.

परंतु, खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांसह सर्वसामान्य नागरिकांनी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत प्रशासनास जाब विचारत आपल्या भागाचा विकास साधणे गरजेचा आहे. यासाठी खोलात जाऊन अधिकाऱ्यांना प्रश्‍न विचारत प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम अधिक वेगाने होणे गरजेचे आहे. या वेळी श्री. झगडे यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महसूल विभाग आदी विभागातील कामांची माहिती देत यात माध्यमांनी कुठले प्रश्‍न विचारावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. कैलास कमोद, विश्‍वास ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास निवृत्त माहिती संचालक शिवाजी मानकर, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top