esakal | अकोल्यात वाढली देशी कट्टा बाळगण्याची ‘क्रेझ’!
sakal

बोलून बातमी शोधा

akola

अकोल्यात वाढली देशी कट्टा बाळगण्याची ‘क्रेझ’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्ह्यात वेगवेगळ्या मोहिमा आखल्या आहेत.. गुन्हेगारांना व टोळीने गुन्हे करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात जिल्ह्यात घडलेल्या घटनांनी पोलिसांचा धाकच उरला नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. एका महिन्याभरातच जिल्ह्यात तीन घटनांमध्ये देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अकोला शहरातील अकोट फाईल परिसरातील आपातपा चौकात सापळा रचून अकोट फैल पोलिसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीस बुधवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. विशेष म्हणजे, या युवक दिवसभर देशी कट्टा घेवून परिसरात फिरत होता. ही अकोला जिल्ह्यातील देशी कट्टा जप्त करण्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन युवकांना ता. १२ ऑगस्ट रोजी देशी कट्ट्यासह अटक केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेच अकोट शहरात ता. २७ ऑगस्ट रोजी देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त केले होते. त्यानंतर आठवडाभरातच अकोला शहरात पुन्हा देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला अकोट फैल पोलिसांनी अटक केली.

गेले काही वर्षांत जवळ देशी पिस्तूल बाळगण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत. अवैधरीत्या देशीकट्टा खरेदी करून बाळगण्याची क्रेझ वाढत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अकोला शहरात युवक खुलेआम देशी कट्टे घेवून फिरत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

अशी केली अटक

अकोट फाईल पोलिस स्टेशन अंतर्गत एक युवक आपातापा चौकात कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एक पथक पाठवून सापळा रचला असता साधना चौक येथील रहिवासी आरोपी शेख यासीम शेख नाझीम हा कमरेला पिस्टल लावून फिरत असताना आढळला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याचे जवळून एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत कडतूस असा एकूण २६ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

तरुणांच्या हातात शस्त्र येतात कोठून?

देशी कट्टा आढळून आलेल्या तरूणांचे वय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वयाचे आहे. यापूर्वीही जुने शहरात अटक केलेले तरून १८ ते २० वर्षे वयोगटातील होते. या तरूणांच्या हातात लेखणी ऐवजी शस्त्र बघून काळजी करण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणांच्या हातात शस्त्र येतात कोठून? कोण त्यांना शस्त्र पुरवितो? त्यांचा ‘गॉडफादर’ कोण, असा प्रश्न पडला आहे. या दिशेनेही पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे. महिनाभरात तीन घटना उघडकीस आल्याने पोलिस अधीक्षक या संदर्भात गांभिर्याने विचार करून कारवाई करतील, अशी अपेक्षा अकोलेकरांना आहे.

loading image
go to top