रेल्वे, खासदाराचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Threats to blow up Railways MPs house with bombs akola

रेल्वे, खासदाराचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी

अकोला - अकोला- पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी फोनवरून मिळाली असल्याची माहिती मंगळवारी (ता. २७) रात्री मुंबई येथील नियंत्रण कक्षाकडून नागपूर नियंत्रण कक्षाला व तेथून अकोला पोलिसांना मिळाली. त्यानंतरी अकोला पोलिसांनी तातडीने पावले उचलत अकोला रेल्वे स्थानकावर संपूर्ण यंत्रणेसह शोध मोहीम राबविली. खासदारांच्या निवास स्थानीही तपासणी करून बंदोबस्त वाढविण्यात आला.

मंगळवार, ता. २६ जुलै रोजी रात्री ९.४५ वाजता अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक १७६८३) मध्ये बॉम्ब असल्याचे आणि माजी केंद्री राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याच्या धमकीचा कॉल आला आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अकोला पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक, जीआरपी, आरपीएफ, एससीआर पथकासह वरिष्ठ पोलिस अधिकारी अकोला रेल्वे स्थानकावर दाखल झाले. रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी असलेली अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरू करण्यात आली. रात्री १० वाजतापासून तपासणी सुरू झाली. तब्बल ३० मिनिटे श्वान पथक व बॉम्ब शोध पथकाने संपूर्ण गाडी शोधून काढली. रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशी केली व त्यांचे छायाचित्रही घेण्यात आले. मात्र, काहीच हाती लागले नाही. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात गाडी रवाना करण्यात आली.

फोन कॉलचा तपास सुरू

मुंबईच्या नियंत्रण कक्षाने नागपूर येथील नियंत्रण कक्षाला अकोल्यात रेल्वे व खासदारांच्या घरात बॉम्ब असल्याची माहिती दिली. नागपूर नियंत्रण कक्षाने ही माहिती अकोला पोलिस अधीक्षक व नियंत्रण कक्षाला दिली. हा कॉल कुणी केला होता, कॉल करणाऱ्याचा काय उद्देश होता याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

परळीपर्यंत प्रत्येक स्थानकावर तपासणी

अकोला रेल्वे स्थानकावरून रवाना झालेल्या पूर्णा एक्स्प्रेसची वाशीम, हिंगोली, पूर्णापर्यंत तपासणी करण्यात आली. पुढे हीच गाडी पूर्णा येथून नांदेड, परळीपर्यंत जाते. त्यामुळे तेथेही प्रत्येक स्थानकावर तपासणी करण्यात आली. अकोल्यात नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहिती प्रमाणे हीच माहिती रेल्वे मार्गावरील सर्व प्रमुख स्थानकावरील स्थानिक पोलिसांनाही मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर गाडीची तपासणी करण्यात आली.

Web Title: Threats To Blow Up Railways Mps House With Bombs Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top