Akola : वन कार्यालयात आदिवासींचा ठिय्या; विहिरीसाठी मागितली परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

वन कार्यालयात आदिवासींचा ठिय्या; विहिरीसाठी मागितली परवानगी

बुलडाणा : जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा चाळीस टापरी परिसरातील आदिवासींचे गेल्या 30 वर्षांपासून वास्तव्य आहे. परंतु, अशाही परिस्थिती त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे दरवर्षी पाणी संकट भेडसावत असते. दरम्यान, प्रशासनाच्या सततच्या दिरंगाई आणि आश्‍वासन धोरणाला कंटाळून जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या कार्यालयात काल संध्याकाळी 5 वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. सदर आंदोलनात लहान मुलांसह महिलांचा समावेश असून, रात्री उशिरापर्यंत सदर आंदोलन सुरूच होते.

आदिवासी बहुल भाग असलेल्या चाळीस टापरी हे वनक्षेत्रात वसलेले गाव असून, येथे मुलभूत सुविधा आणि पाण्याची समस्या ही अनेक वर्षांपासून आहे. परंतु, या सर्व सोई उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य म्हणजे वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. येथील नागरिकांनी दरवर्षी भेडसावणारी पाणी समस्या लक्षात घेता श्रमदानातून विहीर खोदकाम गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सुरू केले होते.

परंतु, काल सदर खोदकाम करत असताना महिला वनरक्षकाने हरकत घेत परवानगी आणा अन्यथा खोदकाम बंद करा असे सांगितले. यासंदर्भात वनरक्षक महिलेने जळगाव जामोद कार्यालयात बोलावून वरिष्ठांना माहिती देऊ असे सांगितले. यानंतर सर्व आदिवासी हे जळगाव जामोद कार्यालयात आले परंतु, येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हे गायब असल्यामुळे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, रात्री 10 वाजता पोलिसांना पाचारण करण्यात आले असून, जिल्ह्यात 144 कलम लागू होणार असल्यामुळे जमावबंदी आदेशाचे पालन करण्याची सूचना देण्यात आली.

आरएफओ मुख्यलयी अनुपस्थितीत

जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया हे मुख्यालयी नसल्याचे प्रकार सतत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. अशा परिस्थिती वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे आदिवासी बांधवांच्या प्रश्‍नांना समोर जाणार कोण असा सवाल होऊन उपस्थित वन कर्मचार्‍यांनी मनधरणी करण्याचे काम केले.

loading image
go to top