विकासाचे कोरोना ग्रहण सुटेना! 

सुगत खाडे
Sunday, 12 July 2020

जिल्हा वार्षिक योजनेला कोरोनामुळे फटका बसला असून शासनाने निधी देताना हात अखडता घेतला आहे. मिळालेला निधी सुद्धा खर्च करण्यात यंत्रणांची गती मंद आहे. त्यामुळे मिळालेल्या 16 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीपैकी अद्याप केवळ 2 कोटी 25 लाख 75 हजार रुपयेच खर्च झाले आहेत. परिणामी विकास कामांसह शासकीय यंत्रणांना सुद्धा कोरोनाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. 

अकोला  : जिल्हा वार्षिक योजनेला कोरोनामुळे फटका बसला असून शासनाने निधी देताना हात अखडता घेतला आहे. मिळालेला निधी सुद्धा खर्च करण्यात यंत्रणांची गती मंद आहे. त्यामुळे मिळालेल्या 16 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीपैकी अद्याप केवळ 2 कोटी 25 लाख 75 हजार रुपयेच खर्च झाले आहेत. परिणामी विकास कामांसह शासकीय यंत्रणांना सुद्धा कोरोनाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. 

कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात घट झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसू येत आहे. सदर संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व त्यामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने राज्याची घडी पुढील काही महिने अशीच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाने विविध प्रकारच्या विकास कामांना कात्री लावली आहे.

परिणामी शासनाने विविध विकास कामांसाठी केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीवर सुद्धा कात्री लागली असून 2020-21 साठी 165 कोटी 94 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असला तरी आता कोरोना प्रभावामुळे जिल्हा वार्षिक योजनेला केवळ 54 कोटी 45 लाख रुपये मिळतील. सदर निधीपैकी 16 कोटी 50 लाख रुपये जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यापैकी 3 कोटी 28 लाख रुपयांचा निधी यंत्रणांना देण्यात आला असून आतापर्यंत प्रत्यक्षात केवळ 2 कोटी 25 लाख 75 हजार रुपयांचा निधीच विकास कामांवर खर्च झाला आहे. 

कोविडसाठी 13.61 कोटी 
कोरोना विषाणूमुळे शासनाने खर्चाला कात्री लावली आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक निधीच्या वाटपाला सुद्धा चाळणी लावण्यात आली आहे. एकून मंजुर निधीपैकी केवळ 33 टक्केच निधी मिळणार आहे. त्यापैकी 25 टक्के म्हणजेच 13 कोटी 61 लाख रुपये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय-योजना करण्यासाठी खर्च करण्यात येईल. त्यामुळे मुळ विकास कामांवर निधी खर्चाला सुद्धा मर्यादा आल्या आहेत. 

वर्षाअखेर निधी खर्च होणार
कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेसाठी यावर्षी 54 कोटी 45 लाख मिळतील. त्यापैकी 16 कोटी 50 लाख मिळाले आहेत. आतापर्यंत 2 कोटी 25 लाख 75 हजारांचा निधी खर्च झाला आहे. 
- संजय राठोड 
सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: turtle speeds up spending on development works in akola