
अकोला : चार हजार मजुरांच्या हाताला हक्काचे काम
अकोला : मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राेजगार हमी याेजनेकडे (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांचा कल वाढत आहे. दोन वर्षापूर्वी टाळेबंदीच्या काळात सुद्धा मनरेगाने मजुरांच्या हाताला काम दिले. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असून गाव खेड्यांमध्ये शेतीची कामे सुद्धा बंद आहेत. त्यामुळे मजुरांचा कल पुन्हा एकदा मनरेगाच्या कामांकडे वळला असून आठवड्याभरात जिल्ह्यातील सरासरी ४ हजार ६५ मजुरांच्या हाताला हक्काचे काम मिळाले आहे.
ग्रामीण क्षेत्रातील मजुरांचे शहरी भागात स्थलांतरण थांबावे व ग्रामीण भागात विविध शासकीय कामे हाेत राहावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशात ‘महात्मा गांधी राेजगार हमी याेजना’ राबविण्यात येते. योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध प्रकारची कामे राबवून मजुरांच्या हातांना हक्काचे काम देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनरेगाच्या कामांकडे कल अधिक असतो.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात मार्च महिन्यात संपूर्ण टाळेबंदीला लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यापारांसह इतर कामे बंद होती. त्यामुळे या काळात मजुरांना मनरेगाने भक्कम आधार दिला, परंतु नंतर टाळेबंदी शिथिल होताच मजुरांनी मनरेगाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान आता उन्हाच्या झळांमध्ये ग्रामीण भागातील शेती विषयक कामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांचा कल पुन्हा एकादा मनरेगाकडे वाढला आहे. त्यामुळेच १८ मे पर्यंत जिल्ह्यातील ७७९ कामांवर सरासरी ४ हजार ५६ मजुरांची उपस्थिती होती. परिणामी मनरेगाकडे मजुरांची पाऊले वळल्याचे दिसून येत आहे.
यंत्रणानिहाय सुरू असलेली कामे
सामाजिक वनिकरण विभागामार्फत वृक्ष संगोपण, वनीकरण विभागामार्फत वनतळे, ग्रामपंचायतीमार्फत घरकुल, अंतर्गत रस्ते, गोरांसाठी गोठा बांधकाम, वृक्ष संगोपण, सिंचन विहिरची कामे करण्यात येत आहे. तर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड व इतर कामे आणि रेशीम विभागामार्फत तुती लागवडीच्या कामातून मजुरांना हक्काचे काम उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बाळापूर, पातूरची आघाडी तर बार्शीटाकळी पिछाडीवर
मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात बाळापूर व पातूर तालुका आघाडीवर आहे. १८ मे पर्यंतच्या एक आठवड्यात बाळापूर तालुक्यात सरासरी १ हजार ९७ तर पातूर तालुक्यात १ हजार ६२ मजुरांना हक्काचे काम मिळाले. तर बार्शीटाकळी तालुक्यात मात्र मनरेगातून हक्काच्या कामाची सूमार कामगिरी पाहायला मिळत आहे. संपूर्ण तालुक्यात सरासरी केवळ ३०६ मजुरांच्या हातालाच हक्काचे काम देण्यात आले.

मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात १८ मे पर्यंतच्या आठवड्यात २४ हजार ३३७ मनुष्यदिन निमित्ती झाली, तर विविध कामांवर सरासरी ४ हजारांवर मजुरांना हक्काचे काम देण्यात आले.
- बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला
Web Title: Under Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme Thousand Workers Have Job
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..