कोणत्या यंत्रणेवर वाढत आहे कोरोनासह कामाचा ताण.. क्लिक करा आणि वाचा

मनोज भिवगडे
Monday, 13 July 2020

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोन स्थानिक स्वराज्य संस्था कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी आघाडीवर काम करीत असल्यातरी वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत हजारो पदे जिल्ह्यात रिक्त असल्याने या यंत्रणांवरील ताण वाढला आहे. जि.प.च्या 660 तर मनपाच्या 923 जागा रिक्त आहेत.

अकोला  ः जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोन स्थानिक स्वराज्य संस्था कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी आघाडीवर काम करीत असल्यातरी वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत हजारो पदे जिल्ह्यात रिक्त असल्याने या यंत्रणांवरील ताण वाढला आहे. जि.प.च्या 660 तर मनपाच्या 923 जागा रिक्त आहेत.

जिल्हा परिषदेत कारभार प्रभारींच्या खांद्यावर; सीईओंचेही पद रिक्त
मिनी मंत्रालयाच्या नावाने परिचित असलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तब्बल 660 पदं रिक्त आहेत. त्याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषदेच्या कारभारावर सुद्धा होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेत वर्ग-1 सह इतर वर्गाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अनेक पद रिक्त आहेत. अकोला जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या सात पंचायत समित्यांसाठी शासनाने 5 हजार 791 पद मंजुर केले आहेत. त्यापैकी 5 हजार 131 पद भरलेली असून 660 पद रिक्त आहेत. सीईओंचा कारभार सुद्धा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या खांद्यावर आहे. या सर्व रिक्त पदांचा फटका जिल्हा परिषदेच्या योजनांसह शासनाच्या कारभाराला बसत आहे.

जिल्हा परिषदेतील रिक्त रिक्त पदांची स्थिती
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे (डीआरडीए) प्रकल्प संचालक पद रिक्त, जीएडीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाडकडे अतिरिक्त जबाबदारी.
- पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदाची अतिरीक्त जबाबदारी पाणी व स्वच्छता विभागाचे राजीव फडके यांच्याकडे.
- पंचायत समितींच्या सात गट विकास अधिकाऱ्यांपैकी 4 पदं व सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांच्या 8 पदांपैकी पाच पदं रिक्त आहेत.
- जिल्हा परिषदेच्या 11 विभागांसाठी वर्ग-1 व वर्ग-2 च्या 222 अधिकाऱ्यांचे पद मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 165 पदं भरलेली असून, 57 पद रिक्त आहेत.
- वर्ग 3 च्या मंजुर 5 हजार 52 पदांपैकी 4 हजार 613 पद भरलेली आहेत, तर 439 पद रिक्त आहेत. वर्ग 4 च्या 497 पदांपैकी 497 पदं मंजूर आहेत. त्यापैकी 344 पदं भरलेली असून, 153 पदं रिक्त आहेत.

मनपात उपायुक्तांसह 923 जागा रिक्त
अकोला महानगरपालिका आर्थिक अडचणीसोबतच कोरोना संसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच रिक्त पदांचा भारही या संस्थेवर पडला आहे. आयुक्तांनंतर प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असलेले दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याने सहायक आयुक्तांवर त्याचा भार पडला आहे. एकूण वर्ग एकची 15 पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग ड पर्यंतची एकूण 923 पदे रिक्त असल्याने कंत्राटी व बाह्यस्त्रोत मनुष्यबळावर मनपाचा कारभार चालवावा लागत आहे. आस्तापना खर्च हा 35 टक्केपेक्षा जास्त असल्याने शासनाकडून नियमित मंजूर पदे भरण्यासाठी परवानगी नाही.

अकोला महानगरपालिकेतील रिक्त पदांची स्थिती
- एका उपायुक्तांची ठाणे तर दुसऱ्या उपायुक्तांची सातारा बदली, सहायक आयुक्त वैभव आवारे व पूनम कळंबे यांच्यावर अतिरिक्त भार
- विविध विभागातील एकूण वर्ग एकची 19 पैकी 15 पदे रिक्त, चारच अधिकाऱ्यांवर कामाचा भार
- वर्ग "ब'ची 32 पैकी 19 पदे रिक्त, 13 अधिकारीच कार्यरत
- वर्ग "क'ची एकूण 609 पैकी 359 पदे रिक्त आहेत.
- वर्ग "ड'ची एकूण 989 पदे मंजूर असून, त्यापैकी 530 जागा रिक्त आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vacancies in akola municipal corporation and akola zilha parishad