७६ वर्षीय पांडुरंगांची अशीही भक्ती; ५२ वर्षांपासून सायकलने वैष्णोदेवीचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७६ वर्षीय पांडुरंगांची अशीही भक्ती; सायकलने वैष्णोदेवीचा प्रवास

७६ वर्षीय पांडुरंगांची अशीही भक्ती; सायकलने वैष्णोदेवीचा प्रवास

खामगाव : येथील तंत्रनगरात राहणारे पांडुरंग रामचंद्र भालेराव हे गत ५२ वर्षांपासून सायकलने वैष्णोदेवीला जात आहेत. ते ७६ वर्षांचे आहेत. पांडुरंग भालेराव हे मंगळवारी (ता. ३ ऑगस्ट) सकाळी येथील तंत्रनगर भागातून सायकलने वैष्णोदेवीकडे रवाना होणार आहेत. खामगाव ते वैष्णोदेवी हे दोन हजार किलोमीटरचे अंतर आहे. बऱ्हाणपूर, उज्जैन, कोटा, जबलपूरमार्गे ते वैष्णोदेवीला पोहोचणार आहेत. दररोज ८० ते १२५ किलोमीटर अंतर सायकल चालवून वैष्णोदेवी गाठण्याचा त्यांचा मानस असतो. १९६८ सालापासून कितीही अडचणी आल्या तर त्यावर मात करीत दरवर्षी सायकलने भालेराव वैष्णोदेवीला जात आहेत.

गतवर्षी कोरोनाचा उद्रेक अधिक असल्यामुळे ते वैष्णोदेवीला जाऊ शकले नव्हते याची खंत त्यांच्या मनात आजही आहे. रात्रीच्या वेळेस ते कोणत्या नातेवाइकांच्या अथवा ओळखीच्या व्यक्तीच्या घरी मुक्काम करीत नाही. सायकल प्रवास करताना सायंकाळ होईल त्या गावात ते मुक्काम करतात. मुक्काम करताना मंदिर अथवा धर्मशाळा पाहतात. परंतु. प्रथम प्राधान्य मंदिराच्या मुक्कामाला देत असल्याचे भालेराव यांनी सांगितले.

हेही वाचा: अशी मिळवा श्‍वासातून येणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्ती

सकाळी पूजा-अर्चा करून ते सायकलने पुढील प्रवासासाठी रवाना होतात. प्रवासादरम्यान ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता प्रवास सुरू ठेवतात. आधी भालेराव यांनी वैष्णोदेवी बरोबरच सायकलने अनेकदा महाराष्ट्र दर्शन यात्रा सुद्धा केल्या आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये सायकलने भारत भ्रमण यात्रेला निघण्याचे भालेराव यांनी मनोमन ठरविले आहे.

सायकल स्पर्धेत पटकावली अनेक बक्षिसे

७६ वर्षीय पांडुरंग भालेराव हे वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून सायकल चालवत आहे. विसाव्या वर्षी प्रथम त्यांनी खामगाव येथून अकोला येथे जाणे-येणे केले. रोटरी क्लब, विविध संस्था, संघटना यांच्या वतीने होणाऱ्या अनेक सायकल स्पर्धांमध्ये ते भाग घेतात. या स्पर्धेमध्ये त्यांनी अनेक बक्षिसे देखील पटकावली आहेत.

हेही वाचा: कोरोना लसीकरण; साडेचार लाख नागरिकांची कोव्हिशील्डला पसंती!

खामगाव ते वैष्णोदेवीपर्यंतचा प्रवास १८ दिवसांत पूर्ण करणार आहे. रस्त्यात याआधी अनेकांनी पैसा देण्याचा प्रयत्न केला परंतु, पैसा घेतला नाही. रात्रीच्या वेळेस मुक्काम ज्या गावात होतो. त्या गावातील लोक जे जेवायला देतील ते खाऊन रात्र काढतो.
- पांडुरंग भालेराव, खामगाव

Web Title: Vaishnodevi Bicycle Travel Pandurang Bhalerao Distance Of Two Thousand Kilometers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pandurang Bhalerao
go to top