
Valentine Day 2023 : मनमोहक हा पथ प्रेमाचा... मोहर झुलतो कल्पतरुचा..!
बाळापूर :
प्रेम विरही जागणारे
प्रेम हृदयी तेवणारे
प्रेम शब्दातीत आहे
या दिशांना वेढणारे..!
तारुण्याचा उंबरठा चढतांना हृदयाला एक अनामिक हूरहूर लागते...जीवाला कुणाची तरी ओढ लागते... प्रेमाची भावना हृदयातून जन्म घेते... मन दिवसाढवळ्या स्वप्नात रमतं... रात्री चांदण्या मोजत जागतं... यालाच प्रेम म्हणायचे का..? प्रेम ही माणसाची भावनिक गरज आहे. प्रेमाची नैसर्गिक भावना जपली जाते.
व्हॅलेंटाइन डे जसजसा जवळ येतो तसतसं तरुणाईमध्ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. या दिवशी प्रियकर आपल्या प्रेयसीसमोर प्रेम व्यक्त करतो. तरुणाई हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात. प्रेम आणि कविता हे समीकरण तर अगदी एकमेकांत एकरूप झालेले आहे. कविता वाचणं आणि गाणं गुणगुणावसं वाटणं हेच प्रेमात पडल्याचं पहिलं लक्षण आहे. गाण्यातील शब्दात स्वत:च्या प्रेमाचं रूप न्याहाळताना अनेक प्रेमवीर कविता करू लागतात. त्यामुळे प्रेमाचं जग हे स्वरांच्या विश्वात नेणारं असतं... कवी मंगेश पाडगावकर म्हणतात...
तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने!
एक चॉकलेट अर्धं-अर्धं
खाल्लं असेल गोडीने..!
प्रेम ही एक शक्तिशाली भावना आहे, ज्याची कोणतीही चुकीची व्याख्या नाही, कारण ती प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे अनुकूल करते. प्रेम ही एक जबरदस्त भावना आहे जी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली जाऊ शकते.
प्रेम परिभाषित करणे कठीण आहे, मोजणे कठीण आहे आणि समजणेही कठीण आहे. ही एक भावना आहे जी आपल्या अंतःकरणात इच्छा, आकांक्षा आणि आदर निर्माण करते. प्रेमात कोणत्याही अटी, अपेक्षा नसतात.
व्याकरणात चुकलात
तरी प्रेम करता येतं,
कॉन्व्हेटमध्ये शिकलात
तरी प्रेम करता येतं!
तरुणाईची जय्यत तयारी
‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी काही दिवसांपासून तरुणाईची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे, कधी आणि कोणते गिफ्ट द्यायचे, याचे आराखडे बांधले जात आहेत. अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छापत्रे खरेदी करण्यास सुरवात केली आहे.
त्यांच्या सोयीसाठी बाजारातील दुकाने सजली आहेत, तर आठवडाभरापासून सोशल मीडियातून विविध संदेशांमधून प्रेम व्यक्त करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ सप्ताह निमित्ताने तरुणांकडून विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह विविध माध्यमांवर तरुणाई मग्न असल्याचे चित्र आहे.