विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचा आमदारालाच ‘दे धक्का’

mla nitin deshmukh
mla nitin deshmukh

अकोला : शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनाही सोडले नाही. चक्क अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या चान्नी शाखेने धक्का देत चक्क त्यांच्या खात्‍यावर पीक कर्जाची उचल केली. आमदारांना कर्जमाफी नसतानाही कर्जमाफीच्या यादीत आमदार देशमुख यांचे नाव आल्यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला. रविवारी (ता.31) आमदारांनीच पत्रकार परिषद घेवून बँकेच्या या घोटाळ्याची पोलखोल केली.


शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचे पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत पीक कर्जाचे खाते होते. तेव्हा ते जिल्हा परिषद सदस्य होते. त्‍यांच्या पीक कर्ज खात्याबाबत 29 मे 2020 रोजी शाखा प्रबंधक संतोष मगनलाल तापडिया यांनी दिलेल्या माहितीतून पीक कर्ज खात्यातील धक्कादायक माहिती पुढे आली. देशमुख यांनी 13 मे 2013 रोजी एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासह एक लाख 27 हजार 28 ऑगस्ट 2016 परतफेड केली. त्यानंतर त्यांच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम 3657 रुपये 20 मार्च 2017 रोजी भरण्यात आली. कर्जखाते नील झाल्याने ते बँकेच्या नियमानुसार बंद करणे अपेक्षित होते. मात्र ते करण्यात आले नाही. कर्ज खाते नील झाल्यानंतर देशमुख यांच्या खात्यातून व्यवहार झाले.

बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पीक कर्ज उचलण्यात आले. 70 हजार रुपये उचल केल्यानंतर त्यातील 60 हजार रुपये परत खात्यात जमा करण्यात आले. कर्ममाफीच्या यादीत आधार लिंक नसलेल्या खात्‍यात देशमुख यांचे नाव आल्यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला. या व्यवहारासाठी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी कैलास बद्रिलाल अग्रवाल व सहाय्यक प्रबंधक शैलेंद्र सुरेंद्र खोब्राकडे यांच्यावर आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केले आहेत. बँकेनेही या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे शाखा प्रबंधक तापडिया यांनी त्यांच्या पत्रात सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला आमदार देशमुख यांच्यासह उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, विकास पागृत, शहर प्रमुख अतुल पवणीकर, उमेश जाधव, बबलू देशमुख आदींची उपस्थित होती.


शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणीही खाल्ले
विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या चान्नी शाखेत मोतीराम संपत मावळकर यांचे पीक कर्ज खाते होते. त्यांचा 27 जून 2018 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या खात्यात 8 जून 2018 रोजी पीक विम्याचे 30610 जमा झाले होते. त्यातून 7 ऑगस्ट रोजी म्हणजे, खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर 36 हजार रोख रक्कम काढण्यात आली. बँकेत याबाबत कोणतेही व्हाऊचर आढळले नाही. या व्यवहाराचा ठपका चौकशीत कैलाश अग्रवाल व सहायक प्रबंधक कृष्णकांत मधुकर बोरकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून आरोपींनी मृत शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणीही खाल्ले असल्याचे सिद्ध होते. 

या शेतकऱ्यांनाही बसला फटका 
पांग्रा येथील प्रकाश ओंकार जवाळे यांच्या बँक खात्यातून 98 हजार रुपयांची उचल कोणत्याही व्हाऊचरशिवाय करण्यात आली. त्याच प्रमाणे शांताराम नारायण करणकार यांच्या पीक कर्ज पुनर्गठन खात्यातून 50 हजार 300, कैलास पांडुरंग वांडे यांच्या खात्यातून 40 हजार 771 रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याच्या ठपका बँकेनेच केलेल्या चौकशीतून पुढे आला. यासारखे अनेक शेतकरी असून, कर्जखात्यात शिल्लक नसतानाही त्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आली आहे. अशा शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे. हा घोटाळा चार कोटीच्या जवळपास असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

बँकेची आरबीआयकडून करा चौकशी
बँकेतील व्यवहारांची चौकशी आरबीआयकडून व गैरव्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बँकेकडून करण्यात आलेल्या पोलिस चौकशीत टाळटाळ करणारे ठाणेदार व बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली.             

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com