esakal | Washim Zp Election : जि. प. पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

Washim Zp Election : जि. प. पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

Washim Zp Election : जि. प. पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्हा परिषद व पंचायत समितीत आरक्षणाच्या मुद्यावर लागलेली पोटनिवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी (ता.५) जिल्हा परिषदेच्या १४ तर, पंचायत समितीच्या २७ जागांची पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी अटातटीचा सामना होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा ५० टक्केच्यावर गेल्याने जिल्हा परिषदेतील १४ तर, पंचायत समितीच्या २७ जागा रिक्त केल्या होत्या. त्यानंतर तिन वेळच्या स्थगितीनंतर आता ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील १४ जागा कोण घेणार? यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून असेल. रिसोड तालुक्यात कवठा गटात अपक्ष स्वप्निल सरनाईक, काँग्रेसकडून वैभव सरनाईक तर, शिवसेनेच्या मंगला सरनाईक असा, तिरंगी सामना होत आहे. गोभणी गटातून काँग्रेसच्या रेखा उगले, शिवसेनेच्या बेबी ठाकरे, जिल्हा विकास आघाडीच्या पुजा भूतेकर रिंगणात आहेत. भर जहागीर गटात वंचितचे अनिल गरकळ, भाजपचे विनोद नरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित खडसे, अपक्ष योगेश वाळके, पांगरी नवघरे गटातून सहा उमेदवार रिंगणात आहेत.

कारंजा तालुक्यातील भामदेवी गटातून सहा उमेदवार, मानोरा तालुक्यातील कुपटा गटातून चार उमेदवार, तळप गटात चुरशीचा सामना होत असून, चार उमेदवाराचे भाग्य आज ठरणार आहे. फुलउमरी गटातही तीन उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. वाशीम तालुक्यातील काटा गटात शिवसेनेच्या लता खानझोडे, राकाँच्या प्रियंका देशमुख, काँग्रेसच्या संध्या देशमुख, भाजपच्या रुंदा भिसे, वंचितच्या शालिनी राऊत, पार्डी टकमोर गटातून काँग्रेसचे विठ्ठल चौधरी, भाजपचे सुनिल चौधरी, राकाँचे विनोद पट्टेबहादूर, वंचितचे प्रल्हाद वाणी, अपक्ष सरस्वती चौधरी व रामेश्वर कालापाड, उकळीपेन गटात सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे या गटातून तब्बल बारा उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार ? हे बुधवारी (ता.६) ला दुपारपर्यंत समजणार!

जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलनाची परीक्षा

पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेतील १४ व पंचायत समितीच्या २७ जागा कोणाकडे जाणार? यावरच जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन अवलंबून राहणार आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला गमावलेल्या जागा कमवाव्या लागणार आहेत, अन्यथा जिल्हा परिषदेचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.

loading image
go to top