
तालुक्यातील ब्राम्हणवाडा नजीक मारसूळ येथील मग्रारोहायो मधील कामात ६९.८५ लाखांचा अपहार केल्यावरून मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मालेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले
मालेगाव (जि.वाशीम) : तालुक्यातील ब्राम्हणवाडा नजीक मारसूळ येथील मग्रारोहायो मधील कामात ६९.८५ लाखांचा अपहार केल्यावरून मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मालेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी मग्रारोहायो माधवराव साखरे यांनी मालेगाव पोलिसात लेखी तक्रार दिली की, ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा नजिक मारसूळ अंतर्गत मग्रारोहायो अंतर्गत गावामध्ये करण्यात आलेल्या कामात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार रवि काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला. त्या अहवालात नमूद सर्व जबाबदार अधिकारी, ज्यामध्ये तत्कालीन गट विकास अधिकारी संदीप कोटकर, गट विकास अधिकारी कुलदीप कालिदास कांबळे, संजय नामदेव महागावकर, कनिष्ठ अभियंता कैलास नारायण मगर, कंत्राटी तांत्रिक अधिकारी पवन उमेश भुते, सहाय्यक लेखा अधिकारी सुभाष मोतीराम इंगळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश्वर श्रीकिसन तागतोडे, संगणक परिचालक विनोद संभाजी आगाशे, सागर गजानन इंगोले, ग्रामसेवक संतोष मदन खुळे, सोनल बळीराम इंगळे, निलेश कांशीराम ढंगारे, रोजगार सेवक शत्रुघ्न लोडजी खिल्लारे, सरपंच पंजाबराव वामन घूगे तसेच इतर ४९ लाभार्थी यांनी शासकिय पदावर कार्यरत असताना मग्रारोहायोमध्ये २०१७-१८ मध्ये ८१ कामे व २०१८-१९ मध्ये १८ कामे, अशी एकूण १०० कामे करीत असताना शासनाची दिशाभूल करून ६९.८५ लाख रुपयांचा अपहार केला असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. हेही वाचा -अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा पोलिसांनी या १४ जणांविरुद्ध भादवी कलम ४०६, ४२०, ४६४, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार आधारसिंह सोनवणे करीत आहेत. (संपादन - विवेक मेतकर) |
|||