esakal | ...अन् ६ वर्षांपासून खोदलेल्या विहिरीला अचानक लागले गरम पाण्याचे झरे
sakal

बोलून बातमी शोधा

well

...अन् ६ वर्षांपासून खोदलेल्या विहिरीला अचानक लागले गरम पाण्याचे झरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर (sangrampur) तालुक्यातील अकोली येथे चक्क ५ ते ६ वर्षांपासून खोदलेल्या विहिरीला १४ जुलैपासून गरम पाणी येत आहे. त्‍यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, प्रशासनानेही दखल घेत सदर गावातील विहिरीच्या पाण्याचे नमूने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. (well suddenly got hot water after 6 years in sangrampur)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

अकोली हे संग्रामपूर तालुक्यातील ३ हजार लोकवस्ती असलेले गाव असून, गावाच्या उत्तर दिशेला सातपुड्यातून उगम पावलेली जामोद येथून प्रवाह असलेली बेंबळेश्‍वर नदी आहे. सध्या पावसाळा असला तरी, नदीला पाणी मात्र नाही. याच नदीच्या अवघ्या काही अंतरावर भानुदास सोळंके यांचे घर असून, तेथे त्यांनी ६ वर्षांअगोदर विहीर खोदली होती. सदर विहिरीच्या पाण्याचा ते सातत्याने वापर करत असतात. मात्र, १४ जुलैपासून अचानक पाण्याच्या तापमानात बदल होऊन पाणी हातात न घेण्याइतके गरम झालेले आहे.

विशेष म्हणजे दरदिवशी पाण्याचे तापमानातही बदल होत असून, सूर्योदय होण्यापूर्वी पाण्याचे तापमान हे सामान्य पाण्याइतकंच असते, तर दिवस उगवल्यानंतर ते तापू लागते. जशी संध्याकाळ होत जाते तसा तापमानात परत फरक पडत जातो. सदर प्रकारामुळे परिसरातील नागरिक विहीर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. पाण्याचे तापमान इतकं असते की अंघोळीसाठी वापरले तर त्यात थंड पाणी घ्यावे लागते.

पाण्याचे घेतले नमुने -

बेंबळेश्‍वर नदी किनारी असलेल्या विहिरीतून गरम पाणी येण्याचा प्रकार घडत आहे. यासंदर्भात माहिती दिल्यानंतर संग्रामपूर तहसीलदार यांनी सोळंके यांच्या विहिरीची पाहणी करीत पाण्याचे नमुने घेतले आहेत. सदर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे कळते. त्यानंतरच सदर प्रकाराबाबत माहिती समोर येईल. तर, सदर विहिरीपासून अवघ्या २० फुटावर असलेल्या संदीप गावंडे यांच्या विहिरीतील पाणी हे नेहमीप्रमाणे थंड असून, त्यांच्या सुद्धा विहिरीच्या पाण्याचे नमूने घेण्यात आले आहेत.

रासायनिक बदलाचा परिणाम -

जमिनीत एक निश्‍चित स्तरापर्यंत पाण्याची पातळी गेल्यानंतर रासायनिक बदल होऊन पाणी थंड किंवा गरम अशी अभिक्रिया घडून येते. याचे भूपृष्ट आणि भूगर्भ यामध्ये असलेले तापमानानुसार पाण्याचेही तापमान बदलण्याची शक्यता असते. परंतु, याबाबत प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच निश्‍चित काय ते सांगता येणे शक्य आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

loading image