
अकोला जिल्ह्यात राबविणार विधवा शेतकरी दत्तक योजना!
अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील विधवा शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामात ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या उपक्रमातून संपूर्ण शेतीची कामे करून देण्याचा मानस पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी यंदाच्या हंगामात एक कृषी सहाय्यक, एक विधवा शेतकरी महिला दत्तक योजना राबवून हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रत्यक्षता आणण्यात येणार आहे.अकोला जिल्हा खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी विधवा महिलांना खरीप हंगामात शेती कामे करण्यासाठी उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
कृषी विभागाच्या सहाय्याने यावर्षी हा प्रायोगित तत्वावर राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांना आढावा बैठकीत हा उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कृषी सहाय्यकाने एक आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा शेतकऱ्यांना खरीपातील हंगामी कामे ट्रॅक्टरच्या मदतीने पूर्ण करून देण्यासाठी मदत करण्याची सूचना केली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जाणार आहे. डिझेल टाकून शेतीची कामे करून घेतली जाणार आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा महिलांना शेती करताना येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकेल, असा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
अकोटपासून करणार सुरुवात
एक कृषी सहाय्यक, एक विधवा शेतकरी ही दत्तक योजना येत्या ता. १६ मेपासून अकोट तालुक्यातील सुरुवात करण्याबाबतचे नियोजन करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खोत यांना दिला.
हंगामी कामे करण्यासाठी होणार मदत
शेतकरी आत्महत्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने महिलांना शेती करताना अनेक अडचणी येतात. कुटुंबाचे पालनपोषण कराताना शेतीची कामे करून घेताना त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. ही अडचणी लक्षात घेता खरीप हंगामातील कामे करण्यासाठी गरीब कुटुंबातील विधवांना ट्रॅक्टर उपलब्ध करून दिल्यास त्यांना वेळेवर शेतीची कामे पूर्ण करून चांगले उत्पादन घेता येईल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Web Title: Widow Farmer Adoption Scheme Implemented In Akola Bachchu Kadu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..