धक्कादायक! "सुखी संसारात चार वर्षांनी पाळणा हलला, पण मुलगी झाल्याने..." - Akola News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News

Akola News : धक्कादायक! "सुखी संसारात चार वर्षांनी पाळणा हलला, पण मुलगी झाल्याने..."

अकोला : सुखी संसारात चार वर्षांनी पाळणा हलला. पण मुलगी झाल्याने नातेवाईकांची नाराजी होती. आठव्याच महिन्यात प्रसूती झाल्याने बाळाचे वजही कमी. म्हणून तिला आयसीयूमध्ये ठेवले होते. या सर्व विचारातच महिलेने १० दिवसाच्या बालिकेला टाकून देत स्वतःचे जीवन संपवले. 

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील शौचालयातच कुजलेल्या स्थिती मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  


कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवस हा प्रकार कुणाला कळलाच नाही. शुक्रवारी सेवेत रुजू झाल्यानंतर हा प्रकार सफाई कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथील २५ वर्षीय गोदावरी राजेश खिल्लारे नामक महिलेला ता. २ मार्च रोजी प्रसुतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. ता. ३ मार्च रोजी महिलेचे सीजर झाले. तिने मुलीला जन्म दिला.

लग्नानंतर चार वर्षांनी तिला बाळ झालं अन् तिही मुलगी म्हणून नातेवाईकांची नाराजी होती अशी माहिती मुलीच्या माहेरच्या नातेवाईकांकडून मिळाली. या दरम्यान ता.१५ मार्च रोजी सकाळपासूनच गोदावरी खिल्लारे आयसीयुमध्ये असलेल्या दहा दिवसांच्या बाळाला सोडून बेपत्ता झाली होती.

महिलेच्या नातेवाईकांसोबतच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार दिली. महिलेचा शोध लागत नव्हता. नातेवाईक शोधात असताना दोन दिवसानंतर कामावर रुजू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना वार्ड क्रमांक २२ मधील स्वच्छता गृहात दुर्गंधी आली. दरवाजा आतून बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी सिटी कोतवाली पाेलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले अन् दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

महिलेचा मृत्यू विधिमंडळात गाजला -

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात गोदावरी खिल्लारे या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करून जीएमसीच्या गैरकारभाराबाबत आमदार रणधीर  सावरकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनात अवचित्याचा मुद्दा उपस्थित केला. 

या संदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. अकोला जीएमसीचा ढिसाळ कारभाराची बाब पुन्हा उघडी झाली आहे. अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यातील रुग्ण अकोला येथील जीएमसीमध्ये उपचारासाठी येत असताना. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही त्याचा त्रास होतो. अधिष्ठाता यांचा मनमानी कारभार सुरू असलेल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला. सोनोग्राफीपासून अनेक सुविधा बंद आहेत. याकडे आमदार सावरकर यांनी शासनाचे लक्ष वेधले.

शुक्रवारी संपकरी स्वच्छता कर्मचारी सेवेत रुजू झालेत. स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी प्रशासनाला माहिती व त्यामुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी रुग्णालयातर्फे पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेच्या मुलीवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी,अकोला 

टॅग्स :Akolacrime