esakal | ...अन् महिलेची भररस्त्यातच झाली प्रसूती, अकोट-अकोला मार्गावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Born Baby

...अन् महिलेची भररस्त्यातच झाली प्रसूती, अकोट-अकोला मार्गावरील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि. अकोला) : खड्डेमय रस्त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात (akola government hospital) जाण्यास झालेला विलंब व धक्के बसल्याने एका महिलेची तांदुळवाडी फाट्या नजीक रस्त्यातच प्रसूती झाली. तालुक्यातील अकोट-अकोला मार्गावर (akot-akola road) सोमवार दुपारी ४ वाजता हा प्रकार घडला. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. (woman gave birth to baby on road due to potholes on akot akola road)

हेही वाचा: दोघांसाठी फोटोशूट ठरला शेवटचा; जेसीबी व दुचाकीच्या अपघातात ठार

अकोट ते अकोला या ४४ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनातून ये-जा करणा-यांना धक्के बसत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा प्रत्यय सोमवार ता.१९ जुलै रोजी आला. अकोट शहरातील बुधवार वेस भागात राहणाऱ्या नेहा प्रशांत तेलगोटे (वय २८) यांना दुपारी २.३० वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाइक त्यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी नियोजन केले. दुपारी ३ वाजता अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास जाणून आला,सदर महिलेला यावेळी प्राथमिक उपचार करून औषध देण्यात आले. काही वेळेनंतर रुग्णाची स्थिती आणखी खालावल्याने रुग्णास तत्काळ अकोला येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र यावेळी रुग्णाचा पती हजर नसल्याने नातेवाईकांनी स्थानिक डॉक्टरांशी वाद घालायला सुरवात केली. १०२ रुग्णवाहिका सध्या हजर आहे, महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन जा असा सज्जड दम यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या स्टाफ नर्स स्नेहल गोगरे यांनी दिला. रुग्णाचा पती आल्यानंतर काहीवेळेतच रुग्णवाहिका नेहा तेलगोटेला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. रुग्णाची नाजूक स्थिती व खराब रस्ता या स्थितीत रुग्णवाहिका अकोल्याकडे रवाना झाली. मात्र, खड्डेमय रस्त्यामुळे धक्के बसल्याने नेहा यांच्या वेदना वाढल्या. शहरापासून चार किलोमीटर बाहेर आल्यानंतर दुपारी ४ वाजता दरम्यान त्यांची रस्त्यातच प्रसूती झाली. त्यांनी एका मुलास जन्म दिला. अर्धा तासानंतर (४.३० वाजता) त्यांना पुन्हा अकोट ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असून, अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी रुग्णाच्या सासू ताई किशोर तेलगोटे यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीला डॉक्टरांकडून नैसर्गिक प्रसूती होणार असल्याचे सांगण्यात आले होते आणि नंतर अकोला येथे तत्काळ हलवण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्ण नेहा तेलगोटे हिचा पती येईपर्यंत आम्ही थांबतो असे नातेवाइकांनी सांगितले; मात्र नेहाला येथून घेऊन जा अशा उद्धट भाषेत वागणूक देण्यात आल्याचा आरोप ताई तेलगोटे(सासू) यांनी केला आहे.

रेफर रुग्णालय -

अकोट ग्रामीण रुग्णालयात हे ‘रेफर रुग्णालय’ झाले असून, डॉक्टर उपचार न करता परस्पर अकोला येथे जाण्याचा सल्ला देत असल्याचा अनुभव अनेक जणांना आला आहे. त्यामुळे अकोट ग्रामीण रुग्णालयाची ओळख आता ‘रेफर रुग्णालय’ म्हणून झाली आहे. विकास महर्षी म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेणाऱ्या आमदार प्रकाश भारसाकडे यांनी आता तरी रुग्णालयात सोयी सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

loading image