काडं झालेत हाडाचे, पाट घामाचा वाहिला, बोंड बोंड वेचताना, ढीग कापसाचा झाला

काडं झालेत हाडाचे, पाट घामाचा वाहिला, बोंड बोंड वेचताना, ढीग कापसाचा झाला

अकोला : विदर्भातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू आहे. या प्रदेशातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक कापूस असलेला दिसतो. विदर्भ आणि कापूस हे एक सूत्र झालेले आहे. 

पांढऱ्या सोन्याचा प्रदेश म्हणूनही विदर्भाला ओळखले जाते. या विभागाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले; परंतु हाच भाग विकासापासून कोसो दूर असलेला दिसतो. हरित क्रांती'चे पुरस्कतें मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचाच प्रदेश मात्र हरितक्रांतीपासून वंचित राहिलेला दिसतो. 

विठ्ठल वाघ यांच्या कपाशीची चंद्रफुले' या कवितासंग्रहातून विदर्भाचे वैभव समजल्या जाणाऱ्या कापसाच्या विविध रूपांत दर्शन घडते आहे. 

कापसाच्या लावणीपासून ते वेचणीपर्यंतचे शेतकरी जीवनातील बारीकसारीक सगळेच संदर्भ येताना दिसतात. विदर्भातील शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा सोबती असणाऱ्या कापसाच्या व्यथा विठ्ठल वाघ यांच्या कवितेतून येताना दिसतात. 

कापसाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी आनंदित होतो. भाव कमी मिळाला तर त्याच्या व्यथा-वेदनांना पारावार उरत नाही. या कवितासंग्रहातील पहिल्याच कवितेतून कापसाच्या वैभवाचे चित्रण येते आहे.

उदा. 'कापसानं सौभाग्याचं

कुंकू लावियलं माथी.'

असे सौभाग्याचे वैभव समजल्या जाणारा कापूस शेतकऱ्याच्या मनातील संख्या सुखदुःखाचे प्रतीक होऊन अवतरताना दिसतो आहे. कापूस रांगोळी उजळलं घरदार (१३), कापसातून प्रकाश दोहोतला उजळतो (१५), कुण्या मंथनामधून झाड कापसाचे आले, गाव सुदाम वस्तीचे कसे द्वारकाच झाले. असे सुदामाच्या दारिद्रय रुपी झोपड्यांना कृष्णाच्या द्वारकेचे वैभवसंपन्न रूप आणण्याची किमया कापूसच करू शकतो. असा कवीला पक्का विश्वास असलेला दिसतो आहे. 

या देशातील शेतकरी दाखिद्र्यरूपी सुदामा होय आणि कापूस हा कृष्णरूपी वैभवसंपन्नतेचे प्रतीक आहे. शेतकऱ्याच्या जीवनात लाख लाख उत्सव सोहळे कापूसच आणू शकतो. अशा कापसाची परंपरा या देशात युगानुयुगे असलेली दिसते. कृष्णाची करंगळी कापल्यानंतर सुभद्रा बांधलेले कापड हे शेतकऱ्याच्याच शेतातील कापसाचे होते. द्रौपदीला वस्त्र हरणावेळी पुरविलेल्या साड्यांचा धागाही शेतकऱ्याच्या शेतातील होता. 

याच प्रमाणे कबीर, ज्ञानोबा, सावतामाळी, तुकोबा आदी संतमहंतांचे संदर्भ देऊन कवी शेतकरी आणि कापूस यांच्यातील ऐतिहासिक नाते स्पष्ट करू पाहतो आहे. या जगाची अब्रू वाचविण्याचे काम शेतकरी आपल्या शेतात कापूस पीकवून युगानुयुगे करीत आलेला आहे. 

या कापसाच्या धाग्याला सुखाचे कमी; परंतु दुःखाचेच संदर्भ अधिक असलेले दिसतात. त्याच्या कष्टाची व्यथा मात्र कुणालाही कळत नसल्याची खंतही कवी विठ्ठल वाघ यांच्या या कवितासंग्रहातील कवितांमध्ये आहे.

कापसाचे फुटलेले शेत त्यांना पौर्णिमेच्या चांदण्यासारखे, दुधावर फेस यावे, पिठोरी चांदणी रात्र वाटावी, कृष्णाची पाची बोटं लोण्याने भरलेली असावीत, आकाशीचे चंद्रसूर्य कपाशीच्या बोंडावर फुललेत असे वाटते. सासरी-माहेरी नांदणाऱ्या पोरीचे रूप घेऊनही कापूस अवतरतो आहे. 

कापूस म्हणजे पानावरील चुना, कापूस म्हणजे उरूस, कापूस म्हणजे चंद्राचं कमळ, कापूस म्हणजे लक्ष्मीचे रूप, कापूस म्हणजे या विधात्याने निर्माण केलेले संपूर्ण मातीचे वैभवाचे रूप होय. अशा विविध प्रतिमांमधून कापसाच्या वैभवाचे संदर्भ विठ्ठल वाघ यांच्या या कवितासंग्रहातील पानोपानी येताना दिसतात. अशा लक्ष्मीकुळातील कापूस हा अवतारी रूप आहे. त्यामुळेच शेतकऱ्याच्या घरात कापूसरूपी लक्ष्मीची आरती केली जाते. 

या आरतीतील वातीच्या प्रकाशानेच शेतकऱ्याचे जीवन प्रकाशमय होणार आहे असेही कवीला वाटते. उदा. 'संसाराचा गाडा, कापसाच्या माथी, उजळती वाटा, जळताना वाती." असे कापसाचे आणि शेतकऱ्याचे अलौकिक नाते विठ्ठल वाघांची कविता चित्रित करते आहे. 

वर्षानुवर्षे या देशातला शेतकरी कापूस पिकवितो आहे; परंतु त्याचे जीवन बदललेले आहे असे म्हणता येत नाही. कापसाचे डोंगर उचलून त्याच्या डोक्याचीच दरी झालेली आहे. कष्ट करूनही त्याच्या कष्टाला फळ मिळत नसल्याची खंत कवी व्यक्त करताना दिसतात.

उदा.

'काडं झालेत हाडाचे

पाट घामाचा वाहिला बोंड बोंड वेचताना

ढीग कापसाचा झाला.

निढळाच्या घामाचीही भाव ठरताना थट्टा

गाडी भरून एवढी कसा कापूस हलका

वाढे बायकापोरांच्या वांझ प्रश्नांचा गलका.' अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण या कवितेतून कवी करताना दिसतात. शेतात कापूस पीकवून आपले भाग्य उजळेल अशी अपेक्षा धरणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र निराशाच येताना दिसते. कापसाच्या लावणीसाठी काढलेले कर्जसुद्धा शेतकरी फेडू शकत नाही. हे १९८० नंतरचे ग्रामीण वास्तव विठ्ठल वाघ यांची कविता चित्रित करते आहे.

उदा. 'कर्जपाणी फिटायचं आल्याचे तेलमीठ

जाय वर्षावर पुन्हा नव्या लुगड्याची गोठ.' कितीही कापूस पिकला तरीही शेतकऱ्याच्या जीवनात आनंदाचे क्षण येत नाहीत. शेतात कापूस वेचून डोक्यावर गाठोडे घेणारी शेतकरी स्त्री मनातही स्वप्रांचे गाठोडे बांधते. त्यातील साधे नवीन लुगडे घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हे शेतकऱ्याच्या जीवनातील वास्तव या कवितासंग्रहातून कापसाच्या माध्यमातून प्रकट होते आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटांशी सामना करता करता शेतकरी मेटाकुटीला येतो आहे. याविषयीचे चित्रण 'प्रसाद' (५२), 'पाऊस आणि कापूस' (३८), 'अंबर' (२४), 'दंगा' (१९) यासारख्या कवितांतून येताना दिसते. एवढे कष्ट करूनही शेतकऱ्याचे जीवन सुखी नाही; परंतु त्यांच्या घामाचे रक्त शोषून घेणारी रक्तपिपासू नोकरशाही व्यवस्था मात्र मजेत असलेली दिसते आहे. यावरतीही या संग्रहातील विठ्ठल वाघांची कविता कडाडून टीका करताना दिसते. अशा असंख्य अडचणीमुळे या देशातला कापूस पीकविणारा शेतकरी हा उद्विग्न होताना दिसतो. काबाडकष्ट करून कापूस पीकवूनही जेव्हा कापसाला भाव मिळत नाही. तेव्हा त्याचा राग अनावर होतो. हा रागही विठ्ठल वाघ शेवटच्या कवितेतून व्यक्त करताना दिसतात.

उदा. 'रास्त भाव मिळत नाही म्हणून कास्तकाराने कापूस जाळला. 

हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करून कापूस पिकविला; मात्र त्याला कवडीमोल भाव मिळतो तेव्हा तो आपल्याच हाताने कापसाच्या ढिगाला आग लावतो. तेव्हा त्याच्या मनाला होणाऱ्या यातना मरणप्राय असतात. अशा प्रकारे मरणप्राय कापूस शेतकऱ्याच्या जीवनाची कथा व व्यथा या कवितासंग्रहातून विठ्ठल वाघ यांनी चित्रित केलेली आहे. विठ्ठल वाघ यांनी कापसाच्या अनुषंगाने शेतकऱ्याची अस्मानी आणि सुल्तानी संकटांशी वर्षानुवर्षे चालत असलेली झुंज अभिव्यक्त होते आहे. यामुळे या देशातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याच्यावरती आलेल्या संकटाना दूर करून त्याच्या जीवनात सुखाचे दोन क्षण आणणारा कोणीही वाली उरलेला नाही. त्याने फक्त कष्ट करीत राहायचे एवढेच त्याच्या हाती आहे; परंतु शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य फळ मिळत नाही. याविषयीची खंत व्यक्त होते आहे. एकूणच या संग्रहातून विठ्ठल वाघ यांचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांविषयी तिन व्यक्त झालेले आहे. त्याला कापूस लावणीपासून ते कापूस वेचणीपर्यंत आणि त्यानंतर तो विक्रीपर्यंत करावा लागणारा संघर्ष या कवितासंग्रहातून चित्रित झालेला आहे. कवी विठ्ठल वाघ यांचे संपूर्ण आयुष्य विदर्भात गेलेले असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या कापसाच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या आणि अनुभवलेल्या होत्या. त्यामुळे कपाशीची चंद्रफुले आणि त्याला लागणारे ग्रहण त्यांनी अतिशय वास्तवरूपाने मांडलेले आहे असे म्हणता येते.

world cotton day special article on cotton farmers and farming of cotton

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com