रस्त्यावर मास्क टाकता अन् तुम्हीच विचारता ‘रुग्ण लईच वाढून रायलेत राव’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

निदान स्वतःसाठी तरी घ्या काळजी ः रस्त्यावर नका फेकू वापरलेले साहित्य

अकोला : अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी नागरिक रुग्ण ‘लईच वाढून रायलेत राव’ असे म्हणून मोकळे होत आहेत. मात्र, यातीलच काही जण रस्त्यावर मास्क फेकून रुग्णवाढीला अप्रत्यक्षरित्या मदत करीत आहेत. तेव्हा सुज्ञ नागरिक या नात्याने तरी नागरिकांनी काम नसताना बाहेर निघणे टाळावे सोबतच रस्त्यावर कुठेही काहीही फेकू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 गत दोन महिनाभऱ्यापासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून करोनाच्या भीतीने नागरिकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु स्वतःला आजारापासून वाचविण्यासाठी मास्क वापरणारे इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता वापरलेले मास्क रस्त्यावर फेकत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. वापरुन फेकलेल्या मास्कमुळे इतर आजारांचे संक्रमण होण्याचा धोका नाकारता येत नाही तरीही नागरिक बेजबाबदारीने वागत आहेत. 

महत्त्वाची बातमी - अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊशेपार

शहरात मे महिन्यापासून बाधीत रुग्ण वाढीचा वेग धरला आहे. शहरवासीयांकडून मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करण्यात येत आहे. मात्र शहरातील काही ठिकाणी हे मास्क वापरुन नागरिकांनी फेकून दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यातून इतर आजारांचे संक्रमण होण्याची भीती आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील वापरलेले मास्कची योग्य विल्हेवाट लावावी व सर्दी, खोकला व ताप असल्यास योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. परंतु या अशा पद्धतीने मास्क फेकले जात असतील तर महापालिकेच्यावतीने योग्य पाऊल उचलण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. नागरिकांनी देखील ही आणीबाणीची परिस्थिती ओऴखून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

जरा याकडेही द्या लक्ष
वापरलेले मास्क नागरिकांनी रस्त्यावर फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी तसेच रोजच्या कचऱ्याची देखील योग्य विल्हेवाट लावावी. महापालिकेचे कर्मचारी रोज सफाई करतात परंतू सफाई केल्यानंतर देखील काही ठिकाणी कचरा टाकला जातो. या सर्व गोष्टी नागरिकांनी अशा परिस्थितीत टाळल्या पाहिजेत.

आज नऊशेपार उद्या दोन हजारही होऊ शकतात
आज अकोल्याची रुग्णसंख्या नऊशेपार गेली आहे. असे असतानाही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत.तेव्हा आज नऊशेच्या पार गेलेली ही रुग्णसंख्या असेच चित्र राहले तर कधी दोन हजाराच्यावर जाऊन पोहचेल हे सांगता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You put on a mask on the street and you ask