व्यसनाधिनतेचा थरार :थोरल्या भावानेच काढला धाकट्‍याचा काटा

भगवान वानखेडे
Thursday, 27 August 2020

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शिवसेना वसाहत मधील अंबिका चौकात एका मोठ्या भावाने लहान भावाची डोक्यावर लोखंडी पाइप मारून हत्या केल्याची घटना बुधवारी (ता.२७) रात्री दहा वाजता च्या सुमारास घडली.

अकोला :: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शिवसेना वसाहत मधील अंबिका चौकात एका मोठ्या भावाने लहान भावाची डोक्यावर लोखंडी पाइप मारून हत्या केल्याची घटना बुधवारी (ता.२७) रात्री दहा वाजता च्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. जयकुमार मोरे असे मृतकाचे नाव आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अंबिका चौकातील रहिवासी जयकुमार मुरलीधर मोरे व त्याचा मोठा भाऊ अरुण मुरलिधर मोरे यांच्यात कौटुंबिक कलहातून वाद झाले. याच वादातून संतापलेल्या अरुण मोरे याने लोखंडी पाइप जयकुमार मोरे याच्या डोक्यात मारल्याने तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

परिसरातील युवकांनी तसेच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जयकुमार मोरे यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच जयकुमार मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

जुने शहर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेला. त्यानंतर आरोपी अरुण मुरलिधर मोरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात अरुण मोरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आली होती.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहरचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

जुने शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे महेन्द्र बहादुरकर, सदाशिव सुडकर, विजय बासबे आणि नितीन मगर यांनी काही तासातच आरोपी अरुण मोरे याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The younger brother murdered the older brother in Akola due to addiction