युवक कॉंग्रेसचे महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांना घेराव 

मनोज भिवगडे
Thursday, 9 July 2020

विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे उगवले नसल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हजारो तक्रारी शेतकऱ्यांच्या प्राप्त झाल्याने युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांना गुरुवारी दुपारी घेराव घालून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

अकोला : दुष्काळात तेरावा महिना म्हणावे तसे आधीच कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अडचणीत आलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे उगवले नसल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हजारो तक्रारी शेतकऱ्यांच्या प्राप्त झाल्याने युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांना गुरुवारी दुपारी घेराव घालून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 
नापिकी, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे टाळेबंदीने शेतकऱ्यांपुढे आर्थिक पेच निर्माण केला आहे. त्यात यावर्षी बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकले आहे. सोयाबीनचे राज्यातील सरासरी क्षेत्र 40 लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी 20 टक्के क्षेत्रावरील बियाणे उगवलेच नाही. विदर्भातील 10 हजार तर मराठवाड्यातील 45 हजार शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.

 

महाबीजसह नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी शासनाकडे येत असताना आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. बोगस बियाणे विक्रीत मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता युवक कॉंग्रेसने महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. उगवण क्षमता नसतानाही बियाणे खरेदी करून त्याला मान्यता दिली व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असा आग्रह युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे धरला आहे. या आंदोलनात युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख, जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, कॉंग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी पराग कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहाभागी झाले होते. 

दीडशे टक्के भरपाईची मागणी 
बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांची मूळ किंमत वाहतूक खर्च तसेच पेरणी खर्चासह दीडशे ज्ञक्के रक्‍कम प्रत्येक बॅगमागे देण्यात यावी, अशी मागमी युवक कॉंग्रेसनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे. महाबीज व इतक कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांचे निलंबन करून बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress besieges Mahabeej's managing director